Russian and Ukraine flags (Photo Credits: Pxhere/Pixabay)

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्धसंघर्ष अधिक गडद झाला आहे. रशियाने युक्रेनची (Russia Ukraine War) राजधानी कीव शहरावर हल्ला वाढवला आहे. अनेक प्रयत्न करुनही कीव पाडण्यात रशियाला यश आले नाही असा दावा युक्रेनने केला आहे. त्यानंतर रशियन फौजांनी कीव शहराला वेढा घातला आहे. कीव शहरावर चहुबाजूंनी हल्ला करण्याचे आदेश रशियन सैनिकांना मिळाले आहेत. युक्रीयाच्या सैन्याने दावा केला आहे की, समोरासमोरच्या लढाईत विजय मिळत नसल्याने राजधानीत आता रशियाने तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे.

रशियाच्या फैजांनी रविवारी चौथ्या दिवशीही युक्रेनच्या अनेक शहरांवर आर्टिलरी आणि क्रुज क्षेपणास्त्रांचा मारा सुरु केला आहे. मात्र, युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी म्हटले आहे की, राजधानी कीव युक्रेनच्याच हातात आहे. वृत्तसंस्था एएफपी यांनी सैनिकांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शहराच्या अनेक प्रमुख भागांमध्ये तोफा, ग्रेनाईड आणि बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकायला मिळतात. (हेही वाचा, What is NATO? जाणून घ्या नक्की काय आहे 'नाटो' संघटना, त्याचा उद्देश आणि सध्या किती देश आहेत सामील)

राजधानी कीवमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर शत्रूप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहेत. जर्मनीने युक्रेनला रॉकेट लॉन्चर पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. तर अमेरिकेने युक्रेनला आगोदरच 35 कोटी डॉलर्सची सैन्य मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

जर्मनी आणि पश्चिमी देशांनी रशियाला SWIFT वैश्विक भागिदारी प्रणालीतून (global payment system) बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मन सरकारचे प्रवक्त्याे यूक्रेनवर आक्रमण रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या तिसऱ्या प्रतिबंधाची घोषणा केली आहे.

संयुक्त राज्य अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, इटली, ग्रेट ब्रिटन आणि युरोपातील विविध संस्थांनी सहमतीने रशियाचे चलन रुबलचे परिचलन करणाऱ्या केंद्रीय बँकेचे क्षमताही मर्यादीत केली आहे. या प्रवक्त्याने म्हटले आह की, अनेक रशियन व्यापारी, संस्था आणि त्यंच्या कुटुंबीयांचा गोल्डन पासपोर्टही संपविण्यात आला आहे.

जर्मन सरकारच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, जर रशिया युक्रेनवर केलेले हल्ले थांबवत नाही तर युरोपीय शांतता भंग होण्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक त्या सर्व उपायांवर काम केले जाईल.

दरम्यान, रशिया आणि युक्रेन युद्धाचा जगावरही मोठा परिणाम होतो आहे. अनेक देशांत या युद्धामुळे महागाई भडकण्याची चिन्हे आहेत. शिवाय जीवनावश्यक वस्तुंचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात इतर राष्ट्रांनी जर या युद्धात उडी घेतली तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपण्याची शक्यता आहे.