काही महिन्यांपूर्वी संपूर्ण जगाने युक्रेन (Ukraine) आणि रशियामधील (Russia) एक मोठे युद्ध पाहिले. या युद्धाच्या झळा जवळजवळ सर्व देशांना बसल्या. अशात युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या आक्रमणानंतर अनेक महिलांवर बलात्कार (Rape) झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांवर बलात्कार करत असल्याचा दावा केला जात आहे. युक्रेनशी युद्ध सुरू असताना रशियन सैनिक युक्रेनच्या महिला सैनिकांना पकडून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना अमानुष वागणूक देत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या (UN) दूत प्रमिला पॅटन यांनी म्हटले आहे.
युक्रेनच्या महिलांवर झालेल्या बलात्काराबाबत एक मोठी बाब समोर आली आहे. संयुक्त राष्ट्राकडून सांगण्यात आले आहे की, युक्रेनच्या महिलांवर होत असलेले लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि छळ हा रशियाच्या लष्करी धोरणाचा एक भाग आहे. रशियाने 'लष्करी रणनीती'चा भाग म्हणून युक्रेनमध्ये बलात्काराचा वापर केला असे संयुक्त राष्ट्राच्या दूतांनी म्हटले आहे.
#BREAKING Rape used in Ukraine as part of Russian 'military strategy': UN envoy pic.twitter.com/zIKMoB9xfF
— AFP News Agency (@AFP) October 14, 2022
युक्रेनमध्ये रशियाकडून बलात्काराचा वापर युद्धाचे शस्त्र म्हणून केला जात आहे का? असा प्रश्न पॅटन यांना केला गेला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, हे उघड आहे व तसे संकेत सर्व बाजूंनी मिळत आहेत. महिलांना अनेक दिवस ओलीस ठेवून त्यांच्यावर बलात्कार केला जात आहे. इतकेच नाही तर, लहान मुलांशी आणि पुरुषांशीदेखील गैरवर्तन झाले. रशियाचे सैनिक आपल्यासोबत व्हायग्रा घेऊन आले होते. या सर्व गोष्टी पाहता नक्कीच असे दिसून येते की, रशियाने एक शास्त्र म्हणून बलात्काराचा वापर केला. (हेही वाचा: पाकिस्तानमधील रुग्णालयाच्या छतावर आढळले 500 मृतदेह; अनेकांच्या शरीराचे अवयव गायब, तपास सुरु)
सप्टेंबरच्या उत्तरार्धात प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाचा दाखला देत पॅटन म्हणाले की, रशियाने फेब्रुवारीमध्ये आक्रमण केल्यापासून युक्रेनमध्ये बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराच्या शंभरहून अधिक प्रकरणांची संयुक्त राष्ट्रांनी पडताळणी केली आहे. या लैंगिक अत्याचाराचे बळी चार ते 82 वयोगटातील आहेत. हा अहवाल रशियन सैन्याने केलेल्या मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांची पुष्टी करतो, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राने असेही नोंदवले की, अत्याचाराची अशी अनेक प्रकरणे नोंदवली गेली नसून, फार कमी समोर आली आहेत. चालू असलेल्या युद्धादरम्यान विश्वसनीय आकडेवारी मिळणे फार कठीण आहे.