Pakistan Prime Minister Imran Khan | (Photo Credits: Facebook)

Imran Khan On India: पाकिस्तान (Pakistan) चे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी अजानक भारताचे जोरदार कौतुक केले आहे. रविवारी एका जाहीर सभेत त्यांनी भारताचे खुलेपणाने कौतुक केले आणि सलामही केला. इम्रान खानची ही बदललेली स्टाईल पाहून सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रविवारी खैबर पख्तूनख्वामधील मलाकंद जिल्ह्यात एका मोठ्या जनसभेला संबोधित करत होते. या जाहीर सभेत इम्रान खान यांनी भारताचे जोरदार कौतुक केले. यावेळी इम्रान खान म्हणाले, 'मी आज भारताला सलाम करतो. त्यांनी नेहमीचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण पाळले आहे. आज भारताची अमेरिकेशी चतुर्थांश आघाडी आहे आणि निर्बंध लागू असताना ते रशियाकडून तेलही विकत घेत आहेत. कारण भारताचे धोरण आपल्या लोकांसाठी आहे.

युक्रेनच्या संकटावरून युरोपीय संघाने पाकिस्तानला दबावाखाली घेतल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, युरोपियन युनियनचे राजनैतिक अधिकारी पाकिस्तानला जे काही बोलतात, तेच भारताला सांगण्यास घाबरतात. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यावर त्यांनी पाकिस्तानवर रशियावर टीका करण्यासाठी दबाव आणला. मात्र, भारताला काहीही बोलण्याचे टाळले. (हेही वाचा - Hypersonic Missile Attack in Ukraine: युक्रेनमध्ये हायपरसोनिक हल्ला; हे क्षेपणास्त्र किती धोकादायक आहे? भारताकडे अशी क्षमता आहे का? जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, या जाहीर सभेत इम्रान खान यांनी आपल्या बंडखोर खासदारांना पक्षात परतण्याची आणि अविश्वास प्रस्तावावर सरकारला पाठिंबा देण्याची ऑफर दिली. पक्षातील असंतुष्ट खासदारांनी ही संधी सोडली तर चोरांच्या बाजूने मतदान करून खासदारांनी आपली सद्सद्विवेक बुद्धी विकली हे संपूर्ण देशाला समजेल, असेही ते यावेळी म्हणाले. पाकिस्तानच्या जनतेने निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे इम्रान खान म्हणाले.

इम्रान खान यांनी आतापर्यंत सर्वत्र भारताविरुद्ध अपप्रचारचं केला. त्यांनी काश्मीरचा मुद्दा यूएन, ओआयसीपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, भारताच्या वाढत्या प्रभावामुळे त्याला कुठूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे इम्रान सतत निराश झाले आहे. अशात शत्रू देश भारताची स्तुती त्यांच्या तोंडून ऐकून सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे.