Pandoravirus: लवकरच होणार नवीन व्हायरसची सुरुवात? शास्त्रज्ञांना आढळला तब्बल 48 हजार वर्षे दबला गेलेला जुना विषाणू, जगभरात भीतीचे वातावरण
Virus (Photo Credit: IANS)

हळूहळू पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि त्यामुळे हिमनद्या व बर्फ वितळत आहेत. यामुळे आता सुमारे 48,500 वर्षे दाबला गेलेला झोम्बी विषाणू (Zombie Virus) सायबेरियातील (Siberia) बर्फाच्या आतून बाहेर आला आहे. शास्त्रज्ञांनी अलीकडेच अनेक मोठ्या विषाणूंचे पुनरुज्जीवन केले आहे, जे हजारो वर्षांपासून गोठलेल्या सायबेरियन जमिनीखाली (परमाफ्रॉस्ट- Permafrost) दफन केले होते.

पुनरुत्थान करण्यात आलेला सर्वात तरुण विषाणू 27,000 वर्षांचा होता आणि सर्वात जुना- एक Pandoravirus सुमारे 48,500 वर्षे जुना होता. हा आतापर्यंतचा सर्वात जुना विषाणू आहे जो पुन्हा जिवंत झाला आहे. रशियामध्ये सायबेरिया नावाचे एक ठिकाण आहे, ज्याचा बहुतेक भाग 12 महिने बर्फाने झाकलेला असतो. या बर्फाला पर्माफ्रॉस्ट म्हणतात. पण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा बर्फ वितळत आहे (परमाफ्रॉस्ट वितळत आहे). या बर्फाखाली 13 नवीन विषाणू सापडले आहेत. त्यापैकी एक 48,500 वर्षे जुना आहे आणि त्याला Pandoravirus yedoma असे नाव देण्यात आले आहे.

सायन्स अलर्टच्या अहवालानुसार, वैज्ञानिकांनी या धोकादायक विषाणूचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे पुनरुत्थान केले आहे. फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चच्या शास्त्रज्ञ हे संशोधन करत आहेत. या गटात रशिया, फ्रान्स आणि जर्मनीच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, बर्फातून घेतलेल्या अशा नमुन्यांमधून आतापर्यंत संवर्धित केलेले सर्व विषाणू हे मोठे डीएनए विषाणू आहेत, जे केवळ अमिबाला प्रभावित करतात. हे विषाणू सस्तन प्राण्यांना प्रभावित करणार्‍या विषाणूंपासून खूप दूर आहेत. त्यामुळे मानवांना धोका होण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र, असा एक मोठा अमीबा-संसर्ग करणारा विषाणू, ज्याला Acanthamoeba Polyphaga Mimivirus म्हणतात, त्याचा मानवांमध्ये न्यूमोनियाशी संबंध आहे. परंतु हे कनेक्शन अद्याप सिद्ध झाले नाही. त्यामुळे, पर्माफ्रॉस्ट नमुन्यांमधून संवर्धित विषाणू सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करतात असे दिसून येत नाही.

चिंतेची आणखी एक बाब म्हणजे, जसजसे पर्माफ्रॉस्ट वितळत आहे, तसतसे त्यातून एखाद्या संसर्गजन्य रोगाने मरण पावलेल्या व दीर्घकाळ दफन केलेल्या मृत लोकांचे मृतदेह बाहेर पडू शकतात व त्याद्वारे तो संसर्ग पुन्हा जगात पसरू शकतो. स्मॉलपॉक्स संसर्गाचा पुरावा पर्माफ्रॉस्टमध्ये पुरलेल्या मृतदेहांमध्ये आढळला आहे. जागतिक स्तरावर निर्मूलन झालेला एकमेव मानवी संसर्ग म्हणजे स्मॉलपॉक्स. तर विशेषतः दुर्गम ठिकाणी स्मॉलपॉक्सचे पुन्हा आगमन ही जागतिक आपत्ती ठरू शकते.

गेल्या काही दशकांमध्ये, शास्त्रज्ञांनी अलास्का आणि स्वालबार्ड, नॉर्वे येथील पर्माफ्रॉस्ट-प्रभावित जमिनीत पुरलेल्या स्पॅनिश फ्लूमुळे मरण पावलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. गेल्या काही वर्षांत, सायबेरियामध्ये रेनडिअरवर परिणाम करणाऱ्या अँथ्रॅक्सच्या अनेक प्रादुर्भावाची नोंद झाली आहे. 2016 मध्ये मोठा उद्रेक झाला होता, ज्यामध्ये 2,350 रेनडियरचा मृत्यू झाला होता. हा प्रादुर्भाव विशेषत: उन्हाळ्यात झाला होता, ज्यामुळे पर्माफ्रॉस्ट वितळण्यापासून मुक्त होणारे ऍन्थ्रॅक्स हे या उद्रेकाचे कारण असावेत अशा सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा:  पुरुष प्रजाती लवकरच होऊ शकते विलुप्त; Y गुणसूत्र संपण्याच्या मार्गावर, शास्त्रज्ञांच्या खुलाशामुळे जगभरात खळबळ)

1848 मध्ये सायबेरियामध्ये रेनडिअरवर परिणाम करणाऱ्या अँथ्रॅक्सचा प्रादुर्भाव आढळून आला. या उद्रेकांमध्ये, मानवांनी रेनडियर खाल्ल्याने त्यांच्यावरही याचा परिणाम झाला होता. दरम्यान, सायन्स अलर्टनुसार, कॅलिफोर्निया विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ एरिक डेलवार्ट यांनी सांगितले की, या महाकाय विषाणूंचा शोध ही पृथ्वीच्या खाली असलेल्या रहस्यांची केवळ सुरुवात आहे. या विषाणूंसोबत अनेक छोटे व्हायरस अजाणतेपणे जिवंत असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.