Pakistan Snowfall: पाकिस्तानात जोरदार बर्फवृष्टीमुळे 23 लोकांचा मृत्यू, पाकिस्तानच्या मंत्र्याचं लज्जास्पद विधान
Fawad Chaudhry (Photo Credit - Twitter)

पाकिस्तानचे (Pakistan) प्रसिद्ध पर्यटन स्थळ मुरी (Murree) सध्या खूप चर्चेत आहे आणि त्यामागील कारणही खूप वेदनादायक आहे. मुसळधार बर्फवृष्टीमुळे (Snowfall) 23 पर्यटकांचा वाहनांमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांचे सरकार जनतेला वाचवण्यात अपयशी ठरले. तासनतास लोक अडकून पडले होते, पण त्यांना येथून बाहेर काढण्याचा ना प्रयत्न झाला ना वाहतुकीबाबत कोणताही इशारा देण्यात आला. असे असतानाही पाकिस्तानचे मंत्री लज्जास्पद वक्तव्ये करत आहेत. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनी सांगितले की, लोकांना ही आपली अक्कल वापरली पाहिजे. ज्यांना बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी स्नो स्प्रे विकत घ्यावा आणि घरीच एकमेकांवर फवारावे. दोषींना शिक्षा होण्याऐवजी आपल्या निष्काळजीपणामुळे बुचकळ्यात पडलेले पाकिस्तान सरकार उलटसुलट विधाने करत आहे. फवाद चौधरी म्हणाले, 'तिथे बरेच लोक आले होते, त्यामुळे प्रशासन हतबल झाले होते. एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा घरी बसून स्नो स्प्रे आणून एकमेकांवर ओतणे चांगले.

परिस्थिती हाताळणे कठीण होते

या वक्तव्यानंतर फवाद चौधरी सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. मुसळधार बर्फवृष्टी आणि मोठ्या संख्येने लोक येत असल्याने प्रशासनाला परिस्थिती हाताळणे कठीण झाल्याचे फवाद चौधरी यांनी सांगितले. मुरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 23 लोकांमध्ये एका 4 वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. मारी हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रावळपिंडीमधील एक शहर आहे. जे पर्यटकांना खूप आवडते. येथे मोठ्या संख्येने लोक आले होते. प्रचंड बर्फवृष्टीमुळे वाहतूक कोंडीही झाली होती. त्यामुळे लोक वाहनांमध्ये अडकून त्यांचा तेथेच मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 मुलांचा समावेश आहे. (हे ही वाचा Pakistan MP Dance: 'टिप-टिप बरसा पानी'वर पाकिस्तानच्या खासदाराने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ)

ही घटना 'नैसर्गिक आपत्ती' मानली जाईल

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की या भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे आणि ही घटना 'नैसर्गिक आपत्ती' मानली जाईल. रशीद म्हणाले की, बर्फवृष्टीमुळे मुरी परिसरात वाहने पुढे जाऊ शकली नाहीत, त्यामुळे लोक पायी चालायला लागले बर्फामुळे त्यांना चालताही येत नव्हते. मंत्र्यांच्या मते, लोकांच्या मृत्यूचे कारण 'गुदमरणे' आहे. पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक शाहबाज गिल यांनी सांगितले की, जेव्हा जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली तेव्हा लोक त्यांच्या गाड्या रस्त्यावर सोडून हॉटेलमध्ये आश्रय घेण्यासाठी गेले, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. दुसरीकडे पंजाब पोलिसांनी रविवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत 500 हून अधिक कुटुंबांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.