Migration | Representational image (Photo Credits: pxhere)

Pakistan Government Warns Immigrants: शेकडो हजार अफगाण नागरिक आणि देशामध्ये बेकायदेशीरपणे राहात असलेल्या सर्व स्थलांतरितांना 1 नोव्हेंबरपर्यंत स्वेच्छेने निघून जाण्याचा अंतिम इशारा पाकिस्तानचे काळजीवाहू गृहमंत्री सरफराज बुगती (Sarfraz Bugti) यांनी गुरुवारी (26 ऑक्टोबर) दिला आहे. इस्लामाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बुगती यांनी ही घोषणा केली. त्यांनी म्हटले की, आवश्यक कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांना बाहेर काढण्याची योजना आपण पुढे राबवत आहोत. त्यामुळे अशा स्थलांतरितांनी 1 नोव्हेंबरनंतर देश सोडावा.

पाकिस्तान सरकारने स्थलांतरीत नागरिकांबद्दल हा निर्णय सुरुवातीला ऑक्टोबरमध्ये घोषित करण्यात आला होता. अफगाण नागरिकांच्या गुन्हेगारी कारवाया, तस्करी आणि पाकिस्तानी सरकार आणि सैन्याविरुद्धच्या हल्ल्यांमध्ये सहभागी होण्याच्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी देशात झालेल्या 24 पैकी 14 आत्मघातकी बॉम्बस्फोटांसाठी अफगाण नागरिक जबाबदार होते, असाही एक दावा अभ्यासातून आलेल्या निष्कर्षाच्या आधारावर पाकिस्तान सरकारने केला आहे. त्यातूनच सरकारने हा आदेश काढला आहे.

दरम्यान, बुगती यांनी म्हटले आहे की, सर्व अवैध स्थलांतरितांची ओळख पटली आहे. राज्याकडे संपूर्ण डेटा आहे. मला पुन्हा एकदा आवाहन करायचे आहे की, सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांनी अंतिम मुदतीपर्यंत स्वेच्छेने निघून जावे. त्यांनी पुढे इशारा दिला की, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सी मुदतीनंतर देशात राहिलेल्या व्यक्तींना काढून टाकण्यासाठी मोहीम सुरू करतील. बेकायदेशीर स्थलांतरितांना मदत करणार्‍या किंवा लपवून ठेवणार्‍या कोणावरही कारवाई केली जाईल यावरही गृहमंत्र्यांनी भर दिला.

पाकिस्तानातील स्थलांतरितांपैकी बहुसंख्य, प्रामुख्याने अफगाण नागरिक आहेत. जे पाकिस्तानमध्ये दीर्घ कालावधीपासून वास्तव्य करत आहेत. या व्यक्तींवर प्रक्रिया करण्यासाठी सरकार तात्पुरती केंद्रे स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे. जे स्वेच्छेने निर्गमन करतात त्यांना त्यांच्या निर्गमनासाठी दस्तऐवज तयार करणे, चलन विनिमय परवानग्या आणि वाहतूक व्यवस्था यासह पाकिस्तान सरकार मदत देईल आणि सरहकार्यही करतील. यातील काही लोक असे आहेत की, 1979 मध्ये काबूलवर सोव्हिएत आक्रमण झाल्यापासून ते पाकिस्तानमध्ये निवासास आहेत.

लाखो अफगाणांनी संघर्ष आणि युद्धापासून वाचण्यासाठी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला, अनेकांची पाकिस्तान सरकारकडे निर्वासित म्हणून नोंदणी केली गेली. ज्यांची नोंद यूएन एजन्सीकडेही आहे. मात्र, अनेकांची नोंदच नाही. इस्लामाबादने अतिरेक्यांनी अफगाणिस्तानच्या भूभागाचा वापर लढाऊ सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि पाकिस्तानमध्ये हल्ले घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तर काबुलने असे म्हटले आहे की पाकिस्तानची सुरक्षा चिंता ही देशांतर्गत समस्या आहे.