US-Iran Dispute: क्रुड ऑईलच्या किंमतीत वाढ; पेट्रोल-डिझेलचा भडका उडणार?
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी ठार झाला. त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये हवाई हल्ल्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे तेल उत्पादक पश्चिम आशियाई देशात संघर्षाची ठिणगी पडली आहे. याचा तेल उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. इराण हा ओपेक गटात सौदी अरेबियानंतर कच्च्या तेलाचे उत्पादन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. तसेच भारतातील तेलाची गरज भागविण्यासाठी लागणारे तब्बल 10 टक्के तेल इराणकडून आयात केले जाते. याच पार्श्वभूमीवर भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय क्रुड तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. त्यामुळे याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर होणार आहे.

इराणने बुधवारी अमेरिकेच्या लष्करी तळावर 12 क्षेपणास्त्राचा मारा केला. त्यानंतर लगेचचं कच्च्या तेलाच्या किंमतीत 3.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. 'वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया' (Wildlife Trust of India) वर कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 65.57 डॉलर्स इतकी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल-डिझेच्या दराचाही भडका उडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - अमेरिका आणि इराण मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोनं 45 हजारांवर जाण्याची शक्यता)

अमेरिका आणि इराणमधील वाढलेल्या तणावाचा परिणाम जागतिक शेअर बाजारांवरही झाला आहे. भारतातल्या शेअर बाजारात याचे पडसाद पहायला मिळाले. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणवर निर्बंध लादण्याची धमकी दिल्याने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत 2 टक्क्यापेक्षा जास्त वाढ होत असून क्रूड ऑईलच्या किंमती प्रति बॅरल 70 डॉलर्सवर गेल्या आहेत.