Lawsuit Against China: अमेरिकेच्या Missouri राज्याने कोरोना व्हायरसबाबत चीनवर केले गंभीर आरोप, कोर्टात खटला दाखल; चीनने ‘ही’ प्रतिक्रिया देत फेटाळला दावा
Xi Jinping (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) मुद्दाम प्रसार केला असा आरोप करीत, अमेरिका (US) सतत चीन (China) वर दोषारोप करीत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही (Donald Trump) याबाबत सतत वक्तव्ये करीत आहे, निवेदने देत आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या कोर्टामध्ये कोरोना विषाणूच्या विषयावर चीनविरूद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत चीनने कोरोना विषाणूची माहिती लपवून ठेवत, इतरांना संकटाच्या दरीमध्ये ढकलल्याचा आरोप केला गेला आहे. अमेरिकेच्या मिसुरीच्या (Missouri) जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल झाला आहे. अॅटर्नी जनरल एरिक (Attorney General Eric) यांनी चीनी सरकारविरोधात गुन्हा दाखल केला आहे, त्याशिवाय चिनी अधिकारी आणि इतर संस्थांनाही या आरोपामध्ये सामील केले आहे.

कोरोना विषाणूची माहिती लपवणे यासह, वैद्यकीय संशोधनात खोटे बोलणे, खराब वैद्यकीय उपकरणे पुरवणे, अलाना व्हिस्ल ब्लोव्हरला अटक अशा आरोपांचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, जगभरात या साथीच्या रोगाचा प्रसार करण्याचा गंभीर आरोपही आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की, डिसेंबर 2019 मध्ये चिनी सरकारला कोरोना विषाणूबद्दल माहित होते परंतु त्यांनी जगाला याबाबत काहीच सांगितले नाही. मात्र जे लोक याबाबत माहिती देण्यासाठी पुढे आले त्यांना चीनी सरकारने अटक केली. 1 जानेवारी रोजी जवळपास दीड दशलक्ष लोकांनी वुहान शहर सोडले ज्याद्वारे हा विषाणू जवळजवळ प्रत्येक देशात पोहोचला.

या खटल्यावर प्रतिक्रिया देताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग (Geng Shuang) म्हणाले, 'या तथाकथित आरोप-प्रत्यारोपांमध्ये कोणतेही तथ्य आणि कायदेशीर आधार नाही. हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. 3 जानेवारीपासून कोरोना व्हायरस विषयाबाबत आम्ही अमेरिकेशी संवाद साधत आहोत आणि अपडेट्सची देवाण घेवाण करत आहोत. या साथीच्या रोगाबाबत चीनी सरकारने दिलेला प्रतिसाद अमेरिकन कोर्टाच्या अखत्यारीत येत नाही'. अशा प्रकारे चीनने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (हेही वाचा: Coronavirus मुळे 154 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान; लैंगिक अत्याचार, अकाली गर्भधारणा, बाल विवाहाचे प्रमाण वाढण्याचा धोका- UNESCO)

दरम्यान, कोरोना विषाणूच्या साथीमुळे अमेरिकेत आतापर्यंत 45 हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर 8 लाखाहून अधिक लोक असुरक्षित आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्थेलाही विषाणूमुळे मोठा झटका बसला असून सुमारे 20 दशलक्ष लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत.