मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला बनले यंदाचे फॉर्च्यून 'बिझनेस पर्सन ऑफ द इयर'
Satya Nadella (PC - getty)

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला (Microsoft CEO Satya Nadella) यांची फॉर्च्यूनच्या 'बिझनेस पर्सन ऑफ द इयर 2019' साठी (Business person of the Year 2019) निवड झाली आहे. फॉर्च्यूनने (Fortune) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या या यादीत जगातील 20 सीईओची निवड करण्यात आली आहे. या बिझनेस मॅनने कठीण उद्दिष्ट साध्य केले आहे. या यादीत नाडेला पहिल्या क्रमांकावर आहेत. या यादीत नाडेला यांच्याशिवाय भारतीय वंशाचे अजय बंगा आणि जयश्री उलाल यांना स्थान मिळाले आहे. मास्टर कार्ड कंपनीचे सीईओ अजय बंगा यांना 8 वे आणि अरिस्ताचे प्रमुख जयश्री उलाल 18 व्या क्रमांकावर आहेत. (हेही वाचा - अनिता इंदिरा आनंद ठरल्या कॅनडाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळातील पहिल्या हिंदू धर्मिय महिला मंत्री; जाणून घ्या त्यांचा प्रवास)

सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टची धुरा हाती घेतल्यानंतर कंपनीच्या महसूलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाडेला 2014 पासून मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदी कार्यरत आहेत. 2018-19 या आर्थिक वर्षांत मायक्रोसॉफ्टचा नफा 39 अब्ज डॉलर असून एकूण महसूल 126 अब्ज डॉलर आहे. 2014 मध्ये नाडेला यांची मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदी निवड झाल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, नाडेला यांनी उत्तम कौशल्य वापरून कंपनीना सर्वाच्च स्थानी पोहचवले आहे.

हेही वाचा - दोन वर्षांनंतर बिल गेट्स पुन्हा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

या यादीत 8 वे स्थान मिळवणारे बंगा 2010 पासून मास्टर कार्डचे सीईओ आहेत. बंगा यांच्या प्रयत्नांमुळे कंपनीला मोठे यश मिळाले असून या कंपनीच्या समभागात 2019 मध्ये 40 टक्के तेजी आली आहे. तसेच या यादीत 18 वे स्थान मिळवणाऱ्या जयश्री उलाल 2008 मध्ये सिस्को सोडून 'अरिस्ता'च्या सीईओ झाल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे कंपनीचा मोठा प्रमाणात विकास झाला. 2019 मध्ये या कंपनीने 31.5 टक्के नफा कमवला.