मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स (Bill Gates) दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 2017 मध्ये बिल गेट्स यांना मागे टाकून अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस (Jeff Bezos) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World’s Richest Person) ठरले होते. परंतु, आता बेझोस जगातील दुसऱ्या क्रमाकांचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. सध्या बिल गेट्स यांची संपत्ती 110 अब्ज अमेरिकन डॉलर (7.89 लाख कोटी रुपये) आहे. तर जेफ बेझोस यांची सध्याची संपत्ती 109 अब्ज अमेरिकन डॉलर (7.82 लाख कोटी रुपये) आहे. (हेही वाचा - कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला बिल गेट्स यांच्याकडून 200 मिलियन डॉलर्सची मदत) सध्या दुसऱ्या क्रमाकांवर असणारे जेफ बेझोस यांनी आपली पत्नी मॅकेन्झीला घटस्फोट दिला. त्यानंतर त्यांच्यात सेटलमेंट झाली. त्याअंतर्गत बेझोस यांनी आपले 25 टक्के शेअर मॅकेन्झीच्या नावे केले. मॅकेन्झीच्या या शेअर्सची सध्याची किंमत 35 अब्ज अमेरिकन डॉलर येवढी आहे. हे शेअर जेफ बेझोस यांच्याकडे असते तर, यावर्षी बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले असते.
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार जगातील 5 टॉप श्रीमंत व्यक्ती -
नाव कंपनी / देश संपत्ती (डॉलर) संपत्ती (रुपये)
बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट (यूएस) 110 अब्ज 7.89 लाख कोटी
जेफ बेजोस, अॅमेझॉन (यूएस) 109 अब्ज 7.82 लाख कोटी
बर्नार्ड अरनॉल्ट, एलव्हीएमएच (फ्रान्स) 103 अब्ज 7.39 लाख कोटी
वॉरेन बफे, बर्कशायर हॅथवे (यूएस) 86.6 अब्ज 6.21 लाख कोटी
मार्क झकरबर्ग, फेसबूक (यूएस) 74.5 अब्ज 5.34 लाख कोटी
दरम्यान, यंदा श्रीमंत यादीत पहिला क्रमाकांवर असणारे बिल गेट्स यांना मायक्रोसॉफ्टचे शेअर वधारल्याचा फायदा झाला. ऑक्टोबर महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्ये 4% तेजी आली होती. तर अॅमेझॉनचे शेअर 2% ने घसरले होते. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे शेअर यावर्षी 48% पर्यंत वाढले आहे. याचा मोठा फायदा बिल गेट्स यांना झाला आहे.