कॅनडाचे पंतप्रधान (Canada Prime Minister) जस्टिन टूडो (Justin Trudeau) यांनी काल, 20 नोव्हेंबर रोजी आपल्या कॅबिनेट मंत्रमंडळाची (Canada Cabinet Minister) घोषणा केली, यामध्ये यंदा हिंदू धर्मिय अनिता इंदिरा आनंद (Anita Indira Anand) यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या हिंदू महिला ठरल्या आहेत. याशिवाय अनिता यांनी यंदा झालेल्या निवडणुकीत एक नवा इतिहास प्रस्थापित केला होता यानुसार कॅनडाच्या संसदेत निवडून आलेल्या त्या पहिल्या हिंदू महिला ठरल्या तर आता सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात देखील आपले स्थान निश्चित केले आहे.
अनिता आनंद कौटुंबिक पार्श्वभूमी
अनिता यांचा धर्म जरी हिंदू असला तरी त्यांचा जन्म आणि शिक्षण हे पूर्णतः कॅनडा मध्येच झाले आहे, त्यांनी काहीवर्षे टोरोंटो विद्यापीठात लॉ च्या प्राध्यापक म्ह्णून काम केले होते. तर अनिता यांचे पालक हे वैद्यकीय क्षेत्रातील असून त्यांचे मूळ हे भारतातील आहे. अनिता यांच्या स्वर्गीय आई सरोज राम या पंजाब मधील अमृतसर येथील असून वडील एस.वी आनंद हे तामिळ आहेत.
अनिता आनंद करिअर
कॅनडा येथील वास्तव्यात त्यांनी इंडो- कॅनडियन समाजाचे अनेकदा नेतृत्व केले होते तर हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कॅनडियन संग्रहालयाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. एअर इंडिया Flight 182 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात सुद्धा त्यांचे खास योगदान आहे. सध्या जस्टिन यांच्या मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेल्या सात मंत्र्यांमध्ये अनिता यांचा समावेश आहे.
दरम्यान, कॅनडाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात बर्दीश छ्ग्गर (Bardish Chagger), हरिजीत सज्जन (Harjit Sajjan), नवदीप बेन्स (Navdeep Bains) यांना देखील महत्वपूर्ण खाती देण्यात आली आहेत. तीन अन्य शीख धर्मिय इंडो- कॅनडियन मंत्र्यांना सुद्धा स्थान मिळाले आहे, मात्र हे मंत्री पूर्वीच्या सरकारचा देखील भाग होते, तर अनिता यांना पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे.