King Charles Funeral Plans: किंग चार्ल्स यांची कर्करोगाशी लढाई सुरूच; वेळोवेळी अपडेट केल्या जात आहे अंत्यसंस्काराच्या योजना
King Charles (संग्रहित संपादित प्रतिमा)

युनायटेड किंगडमचे (United Kingdom) सम्राट किंग चार्ल्स (King Charles) यांना गेल्या महिन्यात कर्करोगाचे (Cancer) निदान झाले. त्यानंतर दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालल्याचे दिसत आहे. किंग चार्ल्स यांच्या बिघडलेल्या आरोग्याच्या स्थितीत, मीडिया रिपोर्ट्स असे सूचित करत आहेत की, बकिंगहॅम पॅलेसचे अधिकारी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नियमितपणे योजना अद्ययावत करत आहेत. वृत्तानुसार, ब्रिटीश रॉयल्टीने 8 सप्टेंबर 2022 रोजी राणी एलिझाबेथच्या दफनविधीच्या एका दिवसानंतर, किंग चार्ल्स यांच्या अंत्यसंस्काराबाबत एक तपशीलवार दस्तऐवज तयार केला.

फेब्रुवारीमध्ये 75 वर्षीय सम्राट किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे निदान झाले व तेव्हापासून ते मीडियाच्या प्रसिद्धीपासून दूर आहेत. द डेली बीस्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तात, अनेक स्त्रोतांचा हवाला देऊन म्हटले आहे की किंग चार्ल्स यांची प्रकृती ‘चांगली नाही’. किंग चार्ल्स यांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या कर्करोगाचे निदान झाले आहे हे अजून उघड झाले नाही, मात्र राजघराण्याने हे स्पष्ट केले गेले आहे की हा प्रोस्टेट कर्करोग नाही. तसेच राजे उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मात्र किंग चार्ल्सच्या खालावलेल्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन मेनाई ब्रिज’ वारंवार अपडेट केले जात आहे. किंग चाल्र्स यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीला ‘ऑपरेशन मेनाई ब्रिज’ असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. मेनाई ब्रिज हे वेल्समधील अँगलसे येथील जगातील पहिल्या लोखंडी झुलत्या पुलाचे नाव आहे. किंग चार्ल्स यांच्या आरोग्य स्थितीनुसार त्यांच्या अंत्यसंस्काराच्या योजनेमध्ये बदल केले जात आहेत. किंग चार्ल्स यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या मृत्यूनंतर नऊ दिवसांनी होणार आहे. यापूर्वी, राणी एलिझाबेथ II आणि किंग चार्ल्सच्या आईचे अंत्यसंस्कार त्यांच्या मृत्यूच्या 10 दिवसांनंतर करण्यात आले होते, ज्याला ऑपरेशन लंडन ब्रिज म्हणून ओळखले जात असे.

किंग चार्ल्स यांना विंडसर कॅसल येथील किंग जॉर्ज VI मेमोरियल चॅपलमधील ‘रॉयल व्हॉल्ट’ मध्ये दफन केले जाण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी किंग चार्ल्सचा मृत्यू होईल, त्यादिवशी त्यांच्या कुटुंबियांना आधी माहिती दिली जाईल आणि नंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांना कळवले जाईल. त्यानंतर कॉमनवेल्थ देशांना आणि शेवटी मीडियाला माहिती दिली जाईल. (हेही वाचा: Chris King Dies: प्रसिध्द रॅपर क्रिस किंगचे निधन, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट)

किंग चार्ल्सनंतर त्यांचा मुलगा प्रिन्स विल्यम याला वारस म्हणून घोषित केले जाईल. ब्रिटीश रॉयल फॅमिली वेबसाइटनुसार, प्रिन्स विल्यम- प्रिन्स ऑफ वेल्स हा सिंहासनाचा वारस आहे. तो राजा चार्ल्स तिसरा आणि डायना- वेल्सची राजकुमारी यांचा मोठा मुलगा आहे. राजा चार्ल्स यांनी आजारपणामुळे आपले पद सोडल्यास, विल्यमला शाही कर्तव्याची जबाबदारी मिळू शकते. यामुळे राजा चार्ल्सच्या मृत्यूनंतर लगेचच विल्यम राजा होऊ शकेल. मात्र, राजा चार्ल्सच्या मृत्यूनंतर अनेक महिने त्याचा राज्याभिषेक होणार नाही.