Sandwiches | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

'मन राहात नाही आणि गुण जात नाही' अशी मराठीत एक म्हण आहे. ही म्हण का पडली असावी याचा अंदाज तुम्हाला या बातमीतील घटनेतून येऊ शकते. तब्बल 9 कोटी रुपये पगार असलेल्या एका भारतीय बँकरचे निलंबन करण्यात आले आहे. हे निलंबन केवळ इतक्याच कारणासाठी की, या महाभागाने चक्क आपल्या कार्यालयातील कँटीनमधून सँडविच (Sandwiches) चोरले. फायनान्शिअल टाईम्सने याबबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार सिटी ग्रुप (Citigroup) ने आपला बँकर शुमार पारस शाह (Paras Shah) यांना नोकरीवरुन निलंबीत करण्यात आले आहे. शुमार पारस शाह हे सिटी ग्रुपमधील सर्वात ज्येष्ठ बँकर होते. ते सिटी ग्रुपच्या लंडन (London) येथील युरोप मुख्य कार्यालयात उच्च पदावर कार्यरत होते.

विशेष म्हणजे पारस शाह हे अवघे 31 वर्षांचे असून, युरोपमधील ते सर्वात महाकडे क्रेडिट ट्रेडर्स आहेत. आपल्या कारकिर्दीतील 7 वर्षे एचएसबीसी येथे घालवल्यानंतर सन 2017 मध्ये ते सिटी ग्रुपमध्ये आले होते. डेली मेल डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार शुमार पारस शाह यांचा वर्षिक पगार एक मिलियन पाऊंड म्हणजेच भारतीय रुपयांत सुमारे 9 कोटी रुपये इतका होता. (हेही वाचा, ग्राहकाच्या पिझ्झावर थुंकला डिलीवरी बॉय, होऊ शकते 18 वर्षे कारागृहाची शिक्षा, तुर्की येथील घटना)

सिटी ग्रुप आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनसची घोषणा करणार होता. या दरम्यानच शाह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या दोन माजी सहकाऱ्यांनी फायनान्शिअल टाइम्ससोबत बोलताना सांगितले की, शुमार पारस शाह हे एक यशस्वी आणि लोकप्रिय ट्रेडर आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयातील कँटीनमधून सँडविच चोरल्याचा आरोप आहे. मात्र, त्यांनी ही कृती नेमकी किती वेळा केली, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

पारस शाह यांच्या लिंक्डइन प्रोपाईलनुसार त्यांनी सन 2010 मध्ये बाथ यूनिवर्सिटीतून अर्थशास्त्र विषयात ऑनर्स पदवी घेतली. त्याच वर्षी त्यांनी एचसीबीसी येथील फिक्स इनकम विभागात आपल्या करिअरची सुरुवात केली.