Hijab Row in Iran: इराणमध्ये हिजाब वादामुळे वातावरण तापल; पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात आणखी 19 जणांचा मृत्यू
Hijab Row in Iran (PC - Facebook)

Hijab Row in Iran: इराणमध्ये हिजाब वादामुळे वातावरण चांगलचं तापलेलं पाहायला मिळत आहे. इराणमध्ये 22 वर्षीय तरुणी महसा अमिनी (Mahsa Amini) च्या मृत्यूनंतर सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान पोलिस आणि निदर्शकांमध्ये चकमक झाली आहे. शुक्रवारी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 19 जणांचा मृत्यू झाला. इराणची राज्य वृत्तसंस्था IRNA ने सिस्तान आणि बलुचिस्तानचे प्रांतीय गव्हर्नर होसेन मोदारेस खियाबानी यांच्या हवाल्याने सांगितले की, चकमकीत पोलिसांसह 19 लोक ठार झाले आणि सुमारे 20 जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार, आग्नेय इराणमध्ये आंदोलक आणि पोलिस यांच्यात हिंसक चकमक झाली. व्हॉईस ऑफ अमेरिका (व्हीओए) च्या अहवालानुसार, इराणमधील सुन्नी अल्पसंख्याक लोक शुक्रवारी सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांताची राजधानी झिदानमधील मक्की ग्रँड मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी आले यादरम्यान हिंसक हाणामारी झाली. ज्यामध्ये 19 जणांना जीव गमवावा लागला. (हेही वाचा - Pakistan Government Twitter Account Banned in India: पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी, सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय)

व्हॉईस ऑफ अमेरिकाच्या रिपोर्टनुसार, हिंसक चकमकीदरम्यान लोक एका व्हिडिओमध्ये धावताना दिसत आहेत. यादरम्यान गोळीबाराचा आवाजही स्पष्टपणे ऐकू येत आहे. त्याचवेळी एका व्हिडिओ क्लिपमध्ये काही आंदोलक वाहन पेटवताना दिसत आहेत.

दरम्यान, इराणच्या सरकारी माध्यमांनी आंदोलकांचे वर्णन दहशतवादी आणि फुटीरतावादी असे केले आहे. यासोबतच या आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोपही त्यांनी केला. इराणच्या विरोधी नेतृत्वाखालील मानवाधिकार कार्यकर्ते न्यूज एजन्सी (HRANA) ने VOA ला सांगितले की, त्यांच्या सूत्रांनी अंदाज लावला आहे की, किमान 40 निदर्शक मारले गेले आणि किमान 20 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.