गुगल कंपनीमधून तब्बल 1500 कर्मचारी बाहेर; जाणून घ्या काय आहे कारण
Walkout For Real Change (Photo Credit: @fuqianggu)

#Metoo चळवळीची व्याप्ती आता खूपच वाढत आहे. चित्रपटसृष्टीपासून सुरु झालेली ही चळवळ आता वणवा बनून प्रत्येक क्षेत्रात पेटत आहे. मोठ मोठ्या कंपनीतील सीईओंपासून ते कर्मचाऱ्यांंपर्यंत अनेकांची दुष्कृत्ये यातून बाहेर पडली आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा ही फार महत्वाची असल्याने अशा प्रकरणांमध्ये स्वतः कंपन्यांनी लक्ष घालणे सुरु केले आहे. याच पार्श्वभूमी टाटाच्या सुरेश रंगराजन यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र गुगल सारख्या कंपनीने अशा प्रकरणामध्ये आपल्या कर्मचाऱ्याला पाठीशी घातले या कारणावरून गुगल (google)च्या 1500 कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी वॉकआउट केले गेल्याची घटना घडली आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांना सामोरे जावे लागणाऱ्या लैगिक शोषणाविरोधासाठी आवाज उठवण्यासाठी हे कर्मचारी गुगलमधून बाहेर पडले आहेत. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश आहे. न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या लेखामते, अँड्राईडचे निर्माते अँडी रुबिन (Andy Rubin) यांच्यावर 2013 साली लैगिक शोषणाचे आरोप झाले होते. मात्र हे आरोप जगजाहीर असूनही गुगलने त्यांना पाठीशी घातले आणि त्यांना एक्झिट प्लॅन अंतर्गत 9 कोटी डॉलर्स म्हणजे 660 कोटी रु. दिल्याचा आरोप झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हे वॉकआउट केले. याचबाबतील कर्मचाऱ्यांंनी विविध मागण्या कंपनीपुढे ठेवल्या आहेत.

कर्मचाऱ्यांनी 'वॉकआउट फॉर रियल चेंज' या नावाने हे आंदोलन केले. हे आंदोलन गुगलच्या आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को, बर्लिन, लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, अटलांटा, टोक्यो आणि हैदराबादसह सारख्या प्रमुख शहरांत करण्यात आले.

दरम्यान अशा घटनांंच्या बाबतीत अतिशय कठोर पावले उचलत गुगलने दोन वर्षात असे आरोप झालेल्या 48 कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकले होते. यापैकी कोणालाही एक्झिट पॅकेज दिले गेले नसल्याचे कंपनीचे सीइओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी जाहीर केले होते. मात्र अँडी रुबिन यांना हे पॅकेज दिले गेले. त्यामुळे गुगलचे कर्मचारी अजून चिडले आहेत.