सुमारे 25 वर्षांपूर्वी रवांडामध्ये एक नरसंहार (Rwandan Genocide) घडला होता, ज्याच्या कथा ऐकून आजही लोकांचा थरकाप उडतो. आता या रवांडा नरसंहारामधील सर्वात मोठा आरोपी Felicien Kabuga याला शनिवारी फ्रान्समधून अटक करण्यात आली आहे. फ्रान्सच्या कायदामंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. बीबीसीच्या वृत्तानुसार, असनीरेस-सर-सीन येथे छापा टाकताना काबुगा पकडला गेला. इतके वर्षे तो एक खोटी ओळख घेऊन राहत होता व गेल्या 25 वर्षांपासून तो फरार होता. रवांडासाठी तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालयाने 84 वर्षांच्या काबुगावर नरसंहार आणि मानवतेविरूद्ध गुन्हा केल्याचा आरोप केला होता.
रवांडाच्या हुतु (Hutu) जातीच्या अतिरेकी गटांना आर्थिक पाठबळ दिल्याचा आरोप कबुगावर आहे. 1994 मध्ये रवांडामध्ये वांशिक हिंसाचारात हुतु समुदायाने सुमारे आठ लाख लोकांना ठार मारले होते. तुत्सी जाती आणि त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना हुतु लोक लक्ष्य करीत होते. काबूगाच्या अटकेसंदर्भातील माहितीसाठी अमेरिकेने 50 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही जाहीर केले होते. एकेकाळी रवांडाचा सर्वात श्रीमंत व्यावसायिक Felicien याला शनिवारी पहाटे साडेपाच वाजता पॅरिसमधून अटक करण्यात आली. फ्रान्समध्ये ओळख लपवून राहणारा Felicien आपल्या कुटुंबातील सदस्यांशी फोनद्वारे संवाद साधत असे, याच द्वारे त्याचा शोध घेऊन त्याला पकडले गेले.
Felicien ला आता पॅरिस अपील कोर्टात आणि नंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात हेगला सादर केले जाईल. आफ्रिकेच्या या मोस्ट वॉन्टेड आरोपीवर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने,1997 मध्ये झालेल्या हत्याकांडात सहभागी झाल्याचा आरोप ठेवला होता.
रवांडामध्ये अल्पसंख्य असूनही तुत्सी समाज हा हुतूपेक्षा अधिक शक्तिशाली राहिला आहे. परंतु 1959 मध्ये हे चित्र बदलले. तुत्सी राजवटीचा अंत झाला आणि हजारो लोकांना इतर देशांमध्ये आश्रय घेण्यास भाग पाडले गेले.1990 मध्ये यापैकी काही लोकांनी बंड केले आणि रवांडावर हल्ला करणार्या रवांडन देशभक्त फ्रंट (RPF) ची स्थापना केली. अखेर 1993 मध्ये शांतता करार झाला परंतु एका वर्षात त्यामध्ये बदलही झाला. (हेही वाचा: या चार चोऱ्यांनी एकेकाळी हादरला होता संपूर्ण देश; विकला होता ताज महल, लाल किल्ला आणि संसद भवन)
6 एप्रिल 1994 च्या रात्री तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जुवेनल हबयरिमना यांच्या विमानावर हल्ला झाला आणि त्यात सर्व लोक मरण पावले. अध्यक्ष जुवेनल हे रुवांडामधील बहुसंख्य हुतु समुदायातील होते. हुत्तू समुदायाच्या लोकांनी तुत्सी समुदायाला या हत्येस जबाबदार धरले आणि त्यानंतर हिसाचाराला सुरुवात झाली. 1994 मध्ये एप्रिल ते जून या काळात 100 दिवसात 8 लाख लोक ठार झाले होते. यासाठी Felicien Kabuga आर्थिक पाठबळ पुरवल्याचा आरोप आहे.