कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सार्वजनिकरित्या सण-उत्सव साजरे करू नका असे सांगितले जात आहे. मात्र पाकिस्तान (Pakistan) मध्ये अगदी याच्या उलट निर्णय घेतला गेला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे सात हजारांच्यावर गेली असून, आतापर्यंत 143 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात या वाढत्या घटना पाहूनही, इस्लामिक धर्मगुरुंनी या साथीच्या रोगाचा गांभीर्याने विचार केला नसल्याचे दिसत आहे. या धर्मगुरूंनी धार्मिक मेळावे थांबविण्यास नकार दिल्याने, राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पवित्र रमजान (Ramadan) महिन्यात पाकिस्तानमधील सर्व मशिदी (Mosque) खुल्या राहतील असे जाहीर केले आहे.
पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील आठवड्यात सुरू होणार्या रमजान दरम्यान शुक्रवारच्या नमाजसह अन्य प्रार्थना मशिदींमध्ये केल्या जातील. अशाप्रकारे पाकच्या राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा मौलवीसमोर गुडघे टेकले असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता, पवित्र रमजान महिन्यात मशिदीत प्रार्थना घेण्याच्या मुद्यावर राष्ट्रपतींनी मौलवींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यानंतर मशिदी सुरु राहतील असा निर्णय घेण्यात आला.
याच्या एक दिवस अगोदर राष्ट्रपतींनी जमात-ए-इस्लामीचे प्रमुख, सिनेट सदस्य सिराजुल हक आणि जमीयत उलेमा-ए-इस्लाम फजलचे नेते मौलाना फजलर रहमान यांच्यासह धार्मिक आणि राजकीय नेत्यांशी याबाबत चर्चा केली होती. आता अल्वी यांनी मौलवींशी चर्चा करून 20 मार्गदर्शक तत्त्वे मान्य केली असल्याचे सांगत, मसजिदांमधील तरावीह (संध्याकाळी) आणि शुक्रवारच्या नमाजांना,सशर्त परवानगी जाहीर केली. यात नमाज पढणाऱ्या लोकांमध्ये सहा फूट अंतर ठेवणे, कार्पेट्स काढून टाकणे, मशिदीतील जमीन निर्जंतुक करणे, मास्क वापरणे आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करणे यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Covid-19: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची पत्नी आणि ड्राईव्हरला कोरोनाचा संसर्ग? जाणून घ्या यामागचे व्हायरल सत्य)
दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) रमजानच्या महिन्यात पाळावयाचे नियम सांगितले आहेत. लोकांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवणे, गळाभेट किंवा हस्तांदोलन करणे टाळणे, मेजवानीमध्ये इफ्तार ऐवजी पाकीटबंद अन्न देणे, जे लॉक संक्रमित आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपवास करावा, असे डब्ल्यूएचओने सांगितले आहे.