COVID-19 Vaccine Update: ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या कोविड-19 लसीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम सकारात्मक- रिपोर्ट्स
COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) संशोधकांनी विकसित केलेली कोविड-19 (Covid-19) च्या लसीच्या चाचणीचे सुरुवातीच्या टप्प्यातील परिणाम सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. कोरोना विषाणूंविरुद्ध (Coronavirus) लढण्यास ही लस चांगला प्रतिसाद देत असल्याची अशी माहिती दिलासादायक माहिती टेलिग्राफने (Telegraph) दिली आहे. परंतु, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जगभरामध्ये संशोधन चालू असलेल्या 100 पेक्षा अधिक चाचण्यांपैकी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीचे परिणाम सर्वाधिक दिसून येत आहेत.

या लसीच्या चांगल्या परिणामांमुळे ऑक्सफोर्ड संशोधकांना कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी उत्तम उपाय मिळाला आहे. या लसीमुळे SARS-CoV-2 या विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 या रोगाविरुद्ध लढण्यासाठी दुप्पट शक्ती प्राप्त होत असल्याचे दिसून आले आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या Jenner Institute मध्ये विकसित करण्यात आली आहे. या लसीच्या पुढील विकासाकरता ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने एप्रिल महिन्यात युके मधील ग्लोबल बायोफार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca सह करार केला आहे. या लसीच्या पुढील विकासासाठी आणि मोठ्या प्रमाणावर निर्मितीसाठी मदत करणे आणि कोविड-19 लसीच्या चाचण्यांसाठी उमेदवार उपलब्ध करुन देणे, या बाबींचा या करारात समावेश करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात या लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा सुरु झाला होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात 10,000 व्हॉलेंटिअर्स वर चाचणी करण्यात आली. याला AZD1222 असे नाव देण्यात आले असून हा टप्पा मे महिन्यात पार पडला. दरम्यान पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचे परिणाम अद्याप हाती आलेले नाहीत. (कोरोनावरील औषध बनवण्यात रशियाने मारली बाजी? सर्व क्लिनिकल चाचणी परीक्षणात लस यशस्वी ठरल्याचा सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा)

जूनमध्ये Astrazeneca कंपनीचे सीईओ Pascal Soriot यांनी बेल्जियन रेडिओ स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सफोर्डने विकसित केलेली लस कोरोना व्हायरस विरुद्ध 1 वर्षापर्यंत संरक्षण करेल. रिपोर्टनुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत या लसीचे 200 कोटी डोसेस उपलब्ध करुन देण्याचे Astrazeneca कंपनीचा उद्देश आहे. या कंपनीने युरोपमधील जर्मनी, फ्रान्स, इटली आणि नेदरलँड यांसोबत 4 कोटींहून अधिक ऑक्सफोर्ड कोविड-19 लस वर्षाअखेरपर्यंत देण्याचा करार केला आहे. त्याचबरोबर अमेरिका, युके सह देखील या प्रकराचा करार करण्यात आला आहे.