Coronavirus (Photo Credits: ANI)

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे अर्थचक्र सुद्धा ठप्प झाले आहे. त्यामुळे करोनाला रोखणारी लस कधी उपलब्ध होणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. रशियाच्या (Russia) सेचेनोव्ह विद्यापीठाने (Sechenov University) कोरोना विषाणूवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. विद्यापीठानेच तसा दावा केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण सध्याच्या घडीला यामध्ये रशियाने बाजी मारल्याचे दिसत आहे. तसेच ही लस कोरोना विरोधात वापरण्याससाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही अलेक्झँडर लुकाशेव स्पुटनिकला सांगितले आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांकडून अनेक संशोधन केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोनावरील लस तयार करण्यात रशियाला मोठे यश आल्याचे समजत आहे. रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने 18 जून रोजीच सुरु केल्या होत्या. सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. तसेच स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल. याशिवाय दुसऱ्या गटाला 20 जुलै रोजी डिस्चार्ज देण्यात येणार आहे असे वादिम तारासोव्ह म्हणाले आहेत. महत्वाचे म्हणजे, रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाचा हा दावा खरा ठरला, तर कोरोना विषाणूला रोखणारी जगातील पहिली लस ठरेल. हे देखील वाचा- नेपाळ पंतप्रधान KP Sharma Oli यांच्याकडून अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनावर मात करण्यासाठी शुभेच्छा

चीन येथील वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जगात कोरोनाचे जाळे पसरत गेले. जगभरात कोरोनाचे एकूण 1 कोटी 29 लाख 43 हजार 447 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 5 लाख 69 हजार 328 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 75 लाख 40 हजार 426 जणांनी कोरोनावर मात केली आहे.