Coronavirus (Photo Credits: PTI)

अमेरिकेत केलेल्या एका संशोधनात समोर आले आहे की, सन 2022 पर्यंत जगातील एक चतुर्थांश लोकांना कोरोना लस (Coronavirus Vaccine) मिळू शकणार नाही. बुधवारी बीएमजेमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार हे स्पष्ट झाले आहे की, कोरोना लसीचे वितरण करणे आव्हानात्मक असेल. त्याच वेळी, त्याच जर्नलमधील आणखी एका अभ्यासानुसार असा अंदाज समोर आला आहे की, जगभरातील 3.7 अब्ज प्रौढांना कोविड-19 लस घ्यायची आहे. या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, जागतिक कोरोना व्हायरस लसीकरण कार्यक्रमाची आव्हाने ही लस विकसित करण्याशी संबंधित वैज्ञानिक आव्हानांइतकीच कठीण आहेत.

मासिकामध्ये, लसीच्या मागणीच्या अनुषंगाने विशेषत: निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी योग्य व न्याय्य रणनीती तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी म्हटले आहे की, ‘हा अभ्यास दर्शवितो की उच्च उत्पन्न असलेल्या देशांनी भविष्यात कोविड-19 लसांचा पुरवठा सुनिश्चित केला आहे, परंतु उर्वरित जगापर्यंत लसीचा पुरवठा निश्चित नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘उच्च उत्पन्न असलेल्या देशांना एकूण लसीचे निम्म्याहून अधिक डोस प्राप्त होतील जे जवळजवळ 51 टक्के असेल व जे एकूण लोकसंख्येच्या 14 टक्के आहे. त्यांनतर उर्वरित डोस कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना मिळतील, जे एकूण लोकसंख्येच्या 85 टक्के आहे.’ संशोधकांनी म्हटले आहे की 2022 पर्यंत जगातील जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येच्या कोविड-19 लस मिळू शकणार नाही. त्यातही जर का सर्व लस निर्माते उत्पादनाची क्षमता वाढवत असतील तरी जगातील एक पंचमांश लोकसंख्येला ही लस मिळू शकणार नाही.

संशोधकांनी नमूद केले आहे की, 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत अनेक देशांनी 13 उत्पादकांना एकूण 7.48 अब्ज डोसची ऑर्डर दिली आहे. जरी 13 लस उत्पादक कंपन्या उत्पादन वाढविण्यास सक्षम असतील, तरीही 2021 च्या अखेरीस 5.96 अब्ज डोस तयार होतील.