जगामध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार झाल्यानंतर अनेकांनी याबाबत चीनला (China) दोषी ठरवले होते. चीनने मुद्दाम वूहानच्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार केल्याचे दावे काही राष्ट्रांनी केले होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे तर नेहमीच उघडपणे चीनवर टीका करताना दिसून आले होते. याच पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओची (WHO) टीम चीनमध्ये चौकशीसाठी गेली होती. मात्र आता या चमूला रिकाम्या हाती परतावे लागले आहे. कोरोना साथीच्या प्रादुर्भावाची तपासणी करण्यासाठी चीनला गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमने म्हटले आहे की, डिसेंबर 2019 पूर्वी वुहान किंवा इतरत्र या रोगाचा व्यापक प्रसार झाल्याचा पुरावा मिळालेला नाही.
डब्ल्यूएचओ टीमने असेही म्हटले आहे की, वुहानच्या लॅबमधून कोरोना विषाणू लीक होण्याची कोणतीही शक्यता नाही. डब्ल्यूएचओ तज्ज्ञ पीटर बेन एम्बरेक यांनी याबाबत माहिती दिली. वाहक प्रजातींकडून हा जंतू मानवी शरीरावर पोहोचला असल्याची सर्वात जास्त शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले. याआधी कोरोनाबद्दल बरेच दावे झाले आहेत. वुहानच्या प्रयोगशाळेत चीनने केलेल्या प्रयोगातून त्याचा प्रसार झाल्याचेही सांगण्यात आले होते. हा विषाणू बॅट्सपासून मानवांमध्ये पसरल्याचा दावाही करण्यात आला आहे, परंतु अद्यापपर्यंत या दाव्यांची खात्री पटली नाही.
डब्ल्यूएचओच्या टीमने रूग्णालये, संशोधन संस्था, साथीच्या प्रसाराशी संबंधित पारंपारिक बाजारासह इतरही अनेक ठिकाणी भेट दिली. या संघात 10 देशांतील तज्ञ आहेत. चीनचे लिआंग वेन्यान म्हणाले की, हा विषाणू बाजाराऐवजी शहराच्या इतर भागात पसरला आहे, त्यामुळे व्हायरसची उत्पत्ती अन्यत्र झाली असावी अशी शक्यता आहे. मात्र सध्या तरी हा विषाणू डिसेंबर 2019 पूर्वी चीनमध्ये असल्याचा पुरावा मिळाला नाही.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख Tedros Adhanom यांनी म्हटले आहे की, ‘कोविड-19 च्या नव्या प्रकारावर विद्यमान लसींचा परिणाम न होण्याची बातमी चिंताजनक आहे. यामुळे लसींबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आतापर्यंत विकसित झालेलेया लसी दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकारावर कमी प्रभावी असू शकतात. दक्षिण आफ्रिकेमध्ये अॅस्ट्रॅजेनेका लस वापर थांबविणे हे दर्शवते की, व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला सर्व उपाययोजना करण्याची गरज आहे.’