महासत्ता अमेरिका ( United States) कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाने गारद झाला आहे. अमेरिकेतील कोविड 19 बाधित रुग्णांच्या मृत्यूंची संख्या थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 20,000 इतकी झाली आहे. इमेरिकेतील मृत्यूदर पाहता अमेरिकेने कोरोना व्हायरसची सर्वाधित बळी ठरलेल्या इटलीलाही मागे टाकले आहे. जॉन्स हॉपकिंस यूनिवर्सिटी (Johns Hopkins University) द्वारा प्रकाशित आकडेवारीनुसार अमेरितेतील मृतांची संख्या तब्बल 20,071 इतकी झाली आहे. जगभराचा विचार करता अमेरिका आता कोरोनामुळे नागरिकांचे मृत्यू सर्वाधिक असलेला प्रथम क्रमांकाचा देश ठरलाआहे.
प्राप्त आकडेवारीनुसार अमेरिकेत सध्यास्थितीत कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 5,29,887 इतकी आहे. तर, इटलीत आतापर्यंत 1,52,271 इतके लोक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे एका दिवसात सुमारे 2000 नागरिकांचा मृत्यू होत आहे. एका दिवसात 2 हजार नागरिक मृत्यू झालेला अमेरिका प्रथम क्रमांकाचा देश आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत 2,108 लोकांचा मृत्यू झाला आहे.
न्यूयॉर्कमध्ये गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस संक्रमणामुले 783 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्रयू कुओमो यांनी शनिवारी माहिती दिली की, न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूच्या प्रमाणात स्थिरता आली आहे. परंतू, मृत्यूदर अद्यापही भयावह आहे. 9 एप्रिल या दिवशी 777 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या एक दिवस आधी 789 नागरिकांचा मृत्यू झाला होता. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 8627 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस संकट तोडणार नोकऱ्यांचा लचका, बेरोजागारी वाढणार, प्रत्येक चारपैकी एक जण होणार बेकार- सीएमआयई)
जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे तब्बल 1 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्सने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 1,08,862 नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. यात इटली -19468, स्पेन- 16606, फ़्रांस-13832 आणि यूनाइटेड किंगडम येथील 9875 मृत्यूंचा आकडा सर्वोच्च आहे. जगभरात आतापर्यंत 17,77,517 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यापैकी 4,04,236 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.