Economic Recession | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट हे भारतात आपली व्याप्ती किती प्रमाणात वाढवेल हे आज घडीला तरी सांगता येणे कठीण आहे. पण हे संकट रिकाम्या हाताने जाणार नाही. जाताजाता काहीतरी तडाखा देणार हे नक्की. आपल्या हाती इतकेच की तो तडाखा किती प्रामाणात बसतो. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (Center for Monitoring Indian Economy) वर्तवलेला प्राथमिक अंदाज असा की, देशात 23.4 % म्हणजेच सुमारे एक चतुर्थांश इतक्या प्रमाणात देशात बेरोजगारी (Unemployment) संकट निर्माण होऊ शकते. इतकेच नव्हे तर शहरी भागात हे प्रमाण 30.09 % पर्यंत जाऊ शकते. सीएमआयई (CMIE) ने आपल्या साप्ताहिक सर्वे अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. 5 एप्रिल रोजी समाप्त झालेल्या आठवड्यातील हा डेटा सीएमआयने सोमवारी जाहीर केला. या डेटामध्ये हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सीएमआयईने म्हटल्याप्रमाणे देशभरात मार्च महिन्यात बेरोजगारीचा दर 8.4% इतका होता. जो आता 23% वाढण्याची शक्यता आहे. भारताचे माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ प्रणव सेन यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन केल्यामळे अवघ्या 2 आठवड्यातच तब्बल 5 कोटी लोकांनी आपला रोजगार गमावला आहे. लाईवमिंटने सेन यांचा हवाला देऊन दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अनेक लोक असे आहेत की, जे आपल्या गावी गेले आहेत. लॉकडाऊन समाप्त होताच वास्तव आकडे पुढे येऊ शकतील. ते आकडे आपल्या अंदाजापेक्षाही कितीतरी पटींनी अधिक असतील. (हेही वाचा, Coronavirus: रघुराम राजन म्हणतात देशावर इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक मंदीचे सावट)

भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढण्यास संघटीत क्षेत्रात असलेली नोकरीची कमी हे देखील एक कारण आहे. जवाहर लाल नेहरु यूनिवर्सिटीमध्ये इकनॉमिक्सचे असोसिएट प्रोफेसर हिमाशू सांगतात की, अशाच आकड्यांवरुन आपल्याला काहीसा अंदाज बांधता येऊ शकतो. केवळ भारतच नव्हे तर कोरोना व्हायरस संकटामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन स्थिती आहे. त्यामुळे त्या देशांमध्येही बेरोजगारीचे प्रमाण अधिक कमी झाला आहे. अमेरिकेबाबत बोलायचे तर गेल्या 15 दिवसांमध्ये तिथे 1 कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. हिमांशू यांनी सांगितले की, हे पाहणे अधिक महत्त्वाचे असेन की, लॉकडाऊन संपल्यानंतरची स्थिती कशी असेन. माझे निरिक्षण आहे की, बेरोजगारीचे प्रमाण हे अंदाजापेक्षाही अधिक असू शकते. (हेही वाचा, कोरोना विषाणूमुळे सात मोठ्या शहरांमध्ये स्वस्त होणार घरे; मालमत्तांची विक्री 35 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता)

संपूर्ण देशाचा विचार करायचा तर संपूर्ण देशात एक तिृतियांश लोक असंघटीत क्षेत्रात लोक काम करतात. कोणत्याही आर्थिक संकटात सर्वात प्रथम या लोकांवर पहिला घाव बसतो. लोकांची कमाई घटल्यामुळे लोक आपल्या खर्चात कपात करतील. त्यामुळे पुन्हा एकदा प्रदीर्घ काळासाठी देशात आर्थिक मंदीचे वातावरण दिसू लागेल.