उत्तर कोरियामध्ये (North Korea) दोन वर्षांनंतर कोरोना विषाणूचा (Coronavirus) पहिला रुग्ण आढळला आहे. या नवीन प्रकरणाची पुष्टी झाल्यानंतर, किम जोंग उन यांनी आवाहन केले आहे की कोरोनाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणखी कडक करण्यात याव्यात तसेच नागरिकांद्वारे त्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तसेच, देशात कडक लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, गुरुवारी राजधानी प्योंगयांगमध्ये काही लोकांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये, कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार समोर आला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, आता लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे.
गुरुवारी उत्तर कोरियाने आपल्या पहिल्या कोविड-19 प्रकरणाची माहिती दिली. देशाच्या राज्य माध्यमांनी याचे वर्णन एक गंभीर राष्ट्रीय आणीबाणी म्हणून केले आहे. जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु आतापर्यंत उत्तर कोरियाने आपल्या देशात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली नव्हती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची पुष्टी झाली आहे, तो अनेक दिवसांपासून तापाने त्रस्त होता.
कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (KCNA) नुसार, हे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर किम जोंग उन यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग दोन दिवसांसाठी बंद असल्याच्या बातम्याही येत आहेत. ओमिक्रॉनचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर उत्तर कोरियाच्या सीमेवर पाळत ठेवणे अधिक कडक करण्यात आले आहे. बाहेरून येणाऱ्यांची सखोल चौकशी करावी, असे निर्देश किम जोंग उन यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (हेही वाचा: रूग्णालयात मृत घोषित केलेली व्यक्ती शवागारात जिवंत आढळली; Shanghai मधील धक्कादायक प्रकार)
दुसरीकडे, तज्ञांचे म्हणणे आहे की उत्तर कोरियाची खराब आरोग्य व्यवस्था पाहता देशाला कोरोनाचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. दरम्यान, उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या हुकूमशाहीमुळे एकाकी पडलेल्या देशाला व्यापक कुपोषण आणि अत्यंत खराब आरोग्य व्यवस्थेचा सामना करावा लागत आहे. साथीच्या रोगापूर्वी, संयुक्त राष्ट्रांनी अंदाज लावला की उत्तर कोरियातील एक चतुर्थांशहून अधिक कुपोषित होते. अनेकवेळा बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, उत्तर कोरियातील लोकांना भूक आणि गरीबीमुळे आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले आहे.