China: रूग्णालयात मृत घोषित केलेली व्यक्ती शवागारात जिवंत आढळली; Shanghai मधील धक्कादायक प्रकार
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

गेल्या अनेक दिवसांपासून चीनमध्ये (China) कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या कानी येत आहेत. अशात आता प्रशासन रुग्णांची कशाप्रकारे हाताळणी करत आहे याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शांघायमध्ये (Shanghai) एका ज्येष्ठ नागरिकाला चुकून मृत घोषित केल्यानंतर त्याचा मृतदेह शवागारात पाठवण्यात आला. परंतु तेथे तो जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण आहे. आधीच लोक शहरातील कडक लॉकडाऊनने त्रस्त आहेत, त्यात अशा घटनेमुळे लोकांच्या संतापामध्ये वाढ झाली आहे.

या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असल्याची माहिती प्रशासनाने दिली. चीनमधील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये, रविवारी शांघाय शिनचांगझेंग रुग्णालयाबाहेर दोन लोक मोठ्या पिवळ्या पिशवीसह दिसले. दोघेही शवागारातील कर्मचारी असल्याचे समजत होते. व्हिडीओमध्ये हे दोन कर्मचारी अजून एका कर्मचाऱ्यासोबत काहीतरी बोलताना ऐकू येते. लक्षपूर्वक ऐकल्यावर समजते की, हे दोघे या दुसऱ्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यासमोर एक बॅग उघडतात व त्यामधील व्यक्ती जिवंत असल्याचे एकमेकांना सांगतात.

हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राने सोमवारी ही बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनीदेखील ती व्यक्ती त्यावेळी जिवंत असल्याची पुष्टी केली. या घटनेनंतर शांघायमधील लोकांमध्ये संताप आहे. शांघायच्या स्थानिक प्रशासनावर 26 दशलक्ष लोकसंख्येच्या शहरातील ओमिक्रॉन संकट योग्य रीतीने हाताळले गेले नसल्याबद्दल टीका होत आहे. 1 मार्चपासून शहरात लॉकडाऊन सुरू असून, त्याविरोधात शहरातील अनेक भागांत आंदोलने सुरू झाली आहेत. (हेही वाचा: Bird Flu: मानवी शरीरात पहिल्यांदाच आढळला H3N8 बर्ड फ्लू संसर्ग, चीनमध्ये सापडला पहिला रुग्ण)

दरम्यान, शांघायमध्ये रविवारी 720 हून अधिक सकारात्मक कोविड प्रकरणांसह 7,333 प्रकरणे नोंदवली गेली. रविवारी शहरात 32 जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या उद्रेकात मृत्यूची संख्या 431 वर पोहोचली आहे, मात्र यातील बहुतेक वृद्ध लोक आहेत. शांघाय व्यतिरिक्त, 13 इतर प्रांतीय-स्तरीय प्रदेशांमध्ये नवीन कोरोना प्रकरणे आढळली आहे.