
कोरोना विषाणूचा (Coronavirus) उगम नेमका कुठे झाला याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार, चीन (China) च्या वूहान (Wuhan) शहरामध्ये हा विषाणू सर्वात प्रथम आढळल्याचे मानले जात आहे. याबाबत जगभरातून चीनवर टीकाही झाली आहे. चीनने याचा पलटवार करण्यासाठी आधी हा विषाणू युरोपमध्ये जन्म पावल्याचे लागल्याचे सांगितले होते. मात्र आता चीनने पुन्हा एकदा हास्यास्पद विधान केले आहे. लडाखमध्ये सध्या सुरू असलेल्या भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर, कोरोना विषाणू भारतातून जगात पसरला असा आरोप चिनी शास्त्रज्ञांनी केला आहे.
वृत्तानुसार, चिनी अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांच्या पथकाचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूचा जन्म बहुधा 2019 च्या उन्हाळ्यात भारतात झाला होता. चीनी शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, कोरोना विषाणू जनावरांद्वारे गलिच्छ पाण्यातून मानवांमध्ये पोहोचला. यानंतर तो भारतामधून चीन, वुहानपर्यंत पोहोचला, जिथे त्याची ओळख पटली. चिनी शास्त्रज्ञ असेही म्हणतात की, भारतामधील कमकुवत आरोग्य व्यवस्था आणि तरुण लोकसंख्या यामुळे कोरोना व्हायरस अनेक महिन्यांपर्यंत लोकांना संक्रमित करत राहिला मात्र त्याबाबत आधी माहिती मिळू शकली नाही.
द सनच्या एका वृत्तानुसार, शांघाय इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी एका शोधपत्रात म्हटले आहे की, डिसेंबर 2019 मध्ये वुहानमध्ये कोरोना प्रकरणाची नोंद होण्यापूर्वी हा विषाणू भारतीय उपखंडात होता. चिनी शास्त्रज्ञांनी 17 देशांमधील कोरोना विषाणूजन्य रोगांवर संशोधन करुन हा पेपर प्रकाशित केला आहे. संशोधनाचे नेतृत्व डॉ शेन लीबिंग करीत आहेत. संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, भारताची तरुण लोकसंख्या, अत्यंत खराब हवामान आणि कडक उन्हामुळे हा विषाणू मानवांपर्यंत पोहोचला असेल. (हेही वाचा: COVID-19 Vaccine मिळताच 3 ते 4 आठवड्यांमध्ये ती जनतेपर्यंत पोहोचवू; आरोग्यमंत्र्यांचा दावा)
दरम्यान, सध्या जागतिक आरोग्य संघटना (WHO) चीनमधील कोरोना विषाणूचे स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. डब्ल्यूएचओने यासाठी चीनकडे एक तपासणी पथक देखील पाठवले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना समोर आली घडली होती. याआधी चीनने पुरावा नसताना इटली आणि अमेरिकेवरही कोरोना विषाणूचा प्रसार केल्याचा आरोप लावला होता.