सध्या भारतासह संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या लशीची (Coronavirus Vaccine) आतुरतेने प्रतीक्षा करता आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद, पुणे आणि हैदराबादला भेट देऊन कोरोना लस उपलब्धतेबाबत चर्चा करत आहेत. राजधानी दिल्लीतील (Delhi) सत्ताधारी आम आदमी पक्षाचे सरकारही कोरोना लसीबाबत उत्साहित आहे. शनिवारी कोरोना लसीशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Health Minister Satyendra Jain) म्हणाले की, ‘आम्हाला ही लस मिळताच आम्ही काही आठवड्यांत संपूर्ण दिल्लीतील लोकांवर लसीकरण करू.’ यासह, सत्येंद्र जैन हे देखील म्हणाले की पॉलीक्लिनिकच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने दिल्लीतील लोकांना कोरोनाची लस पुरवली जाईल.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, आता सर्वांची नजर लसीवर आहे. सध्या भारतासह अनेक देश या लसीवर काम करीत आहेत. लसीचे वितरण आणि कोणाला पहिल्यांदा लस मिळणार याबाबत चर्चा सुरु आहे. अशात दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, लस साठवण आणि लसीकरणासाठी पुरेशी पायाभूत सुविधा दिल्लीत उपलब्ध आहे. त्यामुळे लस उपलब्ध झाल्यास दिल्लीतील सर्व लोकांना अवघ्या 3 ते 4 आठवड्यांत लस दिली जाऊ शकते. आता कोरोना लस केंद्र सरकारकडून दिल्ली सरकारला कधी व किती मिळते यावर हे अवलंबून असेल. (हेही वाचा: Coronavirus: 70 टक्के लोकांनी जरी Face Mask वापरला तरी आटोक्यात येईल कोरोना विषाणू महामारी- Study)
सध्या दिल्लीत कोरोना विषाणू संसर्गाची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रानंतर दिल्लीत कोरोना विषाणू रुग्णांच्या सर्वाधिक घटना समोर आल्या आहेत. दिल्ली सरकारनेही कोरोनाच्या विनाशाचा सामना करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची मदत घेतली आहे. जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा शहरात तिच्या साठवणुकीसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध असतील. दिल्लीत मोहल्ला क्लिनिक, दवाखाने, पॉलीक्लिनिक आणि मोठ्या प्रमाणात इस्पितळे आहेत ज्याठिकाणी ही लस दिली जाऊ शकते. त्यामुळे लोकांपर्यंत 3 ते 4 आठवड्यांमध्ये लस उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली पूर्णतः तयार आहे.