
कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) जगभरातील अनेक लोकांनी नोकर्या गमावल्या आहेत. जवळजवळ प्रत्येक देश आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहे. अशात सौदी अरेबियातील (Saudi Arabia) 450 बेरोजगार भारतीयांच्यावर रस्त्यावर उभे राहून भिक मागायची वेळ आली आहे. त्यापैकी बहुतेक लोक तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, काश्मीर, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, पंजाब आणि महाराष्ट्रातील आहेत. या बहुतेक भारतीयांचे वर्क परमिट कालबाह्य झाले आहे आणि सध्या भिक मागून ते गुजराण करीत आहेत. सौदी प्राधिकरणास जेव्हा हे कळाले तेव्हा त्यांनी सर्व भारतीयांना डिटेंशन केंद्रात पाठविले. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
प्राधिकरणाने या कामगारांच्या भाड्याच्या घरात जाऊन त्यांची ओळख पटवून घेतली व नंतर त्यांना ना जेद्दाच्या शुमैसी डिटेंशन केंद्र (Shumaisi Detention Centre) येथे पाठविले. या मजुरांपैकी 39 कामगार उत्तर प्रदेशचे, बिहारचे 10, तेलंगानाचे 5 आणि महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकमधील 4, तर एक आंध्र प्रदेशातील आहे. यासंदर्भात काही व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यात भारतीय कामगार असे म्हणत आहेत की त्यांचा गुन्हा इतकाच आहे की त्यांनी नोकरी गेल्यामुळे भिक मागितली.
याबाबत एका कामगाराने सांगितले, ‘आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. आमच्याकडे कोणतीही काम नसल्यामुळे आम्हाला भीक मागण्यास भाग पाडले गेले. आता आम्ही डिटेक्शन सेंटरमध्ये आहोत.’ इतर काही कामगार म्हणाले की ते चार महिन्यांहून अधिक काळ अशा कठीण अडचणींचा सामना करीत आहोत. एका मजुराने सांगितले, 'आम्हाला दिसत आहे की, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि श्रीलंका येथील मजुरांना त्या-त्या देशाचे अधिकारी मदत करून त्यांच्या देशात परत पाठवत आहेत. मात्र आम्ही इथेच अडकलो आहे.’ (हेही वाचा: कोरोना काळात भारताची मालदीव ला $250 मिलियनची मदत, परराष्ट्र मंत्री अबदुल्ला शाहीद यांनी हिंदीत मानले आभार)
सामाजिक कार्यकर्ते आणि एमबीटी नेते अमजद उल्ला खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी आणि सौदी अरेबियाचे भारतीय दूत औसाफ सईद यांना पत्र लिहून, या 450 मजुरांच्या आवाहनाकडे लक्ष वेधले आहे, तसेच या कामगारांना मदत करण्याची केंद्राला विनंती केली आहे.