कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) चीनसोबत बाहेरील देशांमध्येही विनाश ओढवत आहे. भारतामध्ये (India) आज संध्याकाळ पर्यंत एकूण 34 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. शुक्रवारी इटलीमध्ये (Italy) कोरोना विषाणूमुळे आणखी 49 जणांचा मृत्यू झाला. यासह, देशात या विषाणूमुळे मृत्यूची संख्या वाढून 197 झाली आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वात जास्त मृत्यू चीनमध्ये आणि नंतर इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये या विषाणूच्या संसर्गाची एकूणसंख्या 4,636 इतकी झाली आहे, जी चीन, दक्षिण कोरिया आणि इराणनंतरची सर्वात जास्त नोंद जास्त आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे शनिवारी आणखी 28 जणांचा बळी गेला आणि या विषाणूमुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या वाढून 3,070 झाली. नॅशनल हेल्थ कमिशनच्या म्हणण्यानुसार, या विषाणूच्या संसर्गाची 99 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को किनाऱ्यावरील समुद्रपर्यटन जहाजात असलेल्या 21 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी शुक्रवारी सांगितले की, 'कोरोना विषाणूची पुष्टी होणाऱ्यांपैकी 19 क्रू मेंबर्स आणि 2 प्रवासी आहेत. या वीकेंडला जहाजातील सर्व, 3,533 प्रवाशांची तपासणी केली जाईल.' ग्रँड प्रिन्सेस नावाचे जहाज बुधवारपासून सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अडकले आहे.
भारतातील आणखी 3 लोकांमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे, ज्यामुळे देशातील एकूण रूग्णांची संख्या 34 झाली आहे. नवीन प्रकरणात लडाखच्या दोघांचा समावेश आहे, जे इराणवरून परत आले होते. तामिळनाडूमध्येही एका व्यक्तीला कोरोनाची पुष्टी झाली आहे, ही व्यक्ती ओमानहून परत आली आहे. सध्या या तिघांची प्रकृती स्थिर आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरसमुळे जागतिक मृत्युदर 3.4 टक्क्यांवर पोहचला, 'फ्लू'पेक्षाही जास्त; लस उपलब्ध नसली तरी आजार बरा होऊ शकतो- WHO)
या व्हायरसचा फटका अनेक बड्या कंपन्यांनाही बसला आहे. फेसबुकने (Facebook) शुक्रवारी सांगितले की, ते लंडन आणि सिंगापूर येथील कार्यालय बंद करत आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, शुक्रवारी सिंगापूरमधील मरिना वन कार्यालयात एका कर्मचार्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूची 13 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, चॅनल न्यूज एशियाच्या वृत्तानुसार, आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 130 झाली आहे.