China: अध्यक्ष Xi Jinping यांची भ्रष्टाचारविरोधी मोहीम; ज्येष्ठ अर्थतज्ञ Lai Xiaomin यांना मृत्यूदंडाची शिक्षा, तब्बल 20.29 अब्ज रुपयांची घेतली लाच
Lai Xiaomin (संग्रहित संपादित प्रतिमा)

चायना हूआरॉंग अ‍ॅसेट मॅनेजमेंट (China Huarong Asset Management) कंपनीचे  माजी अध्यक्ष, ज्येष्ठ अर्थतज्ञ लाई झियाओमीन (Lai Xiaomin) यांना लाच, भ्रष्टाचार आणि दोन विवाह प्रकरणी मृत्यूदंड ठोठावण्यात आला आहे. टियांजिन सिटीच्या (Tianjin City) स्थानिक कोर्टाच्या म्हणण्यानुसार 2008 ते 2018 दरम्यान, लाईला 1.79 बिलिअन युआन (277 मिलिअन डॉलर म्हणजेच 20,26,39,48,850.00 रुपये) लाच घेतल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. निकालात, त्यांच्या सर्व वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याचे म्हटले आहे. सध्या चिनी अध्यक्ष शी जिनपिंग भ्रष्टाचाराविरूद्ध मोहीम राबवत आहेत, त्यातील हे एक मोठे प्रकरण आहे.

2020 च्या सुरूवातीस, झियाओमीन यांनी एका सरकारी टीव्ही माहितीपटात कबूल केले की, त्यांनी रोख रकमेची देवाण-घेवाण करण्यास प्राधान्य दिले. पोलिसांनी त्याच्या फ्लॅटवर छापा टाकला आणि 200 दशलक्ष युआनपेक्षा अधिक रक्कम जप्त केली. 2018 मध्ये त्यांना ताब्यात घेतल्यानंतर, मोठ्या मालमत्तासह लक्झरी घड्याळे, कार, सोने आणि कला संग्रह अशा अनेक मौल्यवान गोष्टी त्यांच्याकडे आढळल्या.

चीनमध्ये भ्रष्टाचारासाठी मृत्यूदंडाची शिक्षा ही सामान्य नाही. मात्र, 2018 मध्ये शांक्सी प्रांतातील (Shanxi Province) माजी उपमहापौरांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्याच्या सरकारने भ्रष्टाचाराबाबत 15 लाखाहून अधिक सरकारी अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावली आहे. यावरून, सरकारी कामगार आणि कॉर्पोरेट अधिकारी यांच्यात पसरलेल्या भ्रष्टाचाराबाबत सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका स्पष्ट होते. 2016 मध्ये चीनने भ्रष्टाचारासंदर्भात मृत्यूदंडासह आर्थिक दंड हा 1,00,000 युआन वरून 3 दशलक्ष युआनपर्यंत वाढविला होता, परंतु कोणालाही मृत्यूदंड दिला गेला नव्हता. (हेही वाचा: चीनी अब्जाधीश, अलिबाबा संस्थापक जॅक मा दोन महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत)

बीजिंगचे वकील मो शाओपिंग म्हणाले की लाच प्रकरणात अनेकांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे, फाशीची शिक्षा ही फारच क्वचित दिली गेली आहे. लाई झियाओमीनच्या बाबतीत, मो शाओपिंग म्हणतात की, या प्रकरणात भ्रष्टाचाराशी संबंधित रक्कम खूप मोठी आहे आणि कदाचित गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी रक्कम आहे. या प्रकरणामुळे जनतेमधील संतापही वाढला आहे. मृत्यूदंडाची लोकांमध्ये एक चेतावणी म्हणून पाहिले जात आहे.