चीनमधील चायना हूआरॉंग अॅसेट मॅनेजमेंट (China Huarong Asset Management) चे माजी प्रमुख लाई झियाओमीन (Lai Xiaomin) यांना शुक्रवारी फाशी देण्यात आली. झियाओमीनला लाच घेतल्याबद्दल नुकतीच मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आर्थिक गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये अलिकडच्या वर्षांत दिल्या गेलेल्या सर्वात कठोर शिक्षेपैकी ही एक शिक्षा आहे. टियांजिन सिटीच्या (Tianjin City) कोर्टाने 58 वर्षीय लाई झियाओमीनला भ्रष्टाचार आणि पहिली पत्नी असताना दुसऱ्या महिलेशी विवाह करणे अशा आरोपाखाली दोषी ठरवले होते.
भ्रष्टाचारावर करडी नजर ठेवणाऱ्या चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थेने 2018 मध्ये लाईच्या विरोधात चौकशी सुरू केली आणि नंतर त्याच वर्षी त्याला पक्षातून हद्दपार केले गेले. कोर्टाने आपल्या निकालामध्ये नमूद केले आहे की, लाई यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बांधकाम कराराचे वाटप करणे आणि पदोन्नती देणे यासह स्वतःच्या इतर अनेक फायद्यांच्या बदल्यात गेल्या दशकात जवळपास 1.79 अब्ज युआन प्राप्त केले. कोर्टाने 25 दशलक्ष युआनहून अधिक सरकारी पैशांची फसवणूक केल्याबद्दल लाईला दोषी ठरवले. कोर्टाने सांगितले की, लाईला कायद्याचा धाक नाही आणि तो अत्यंत लोभी आहे. त्याचा गुन्हा खूप गंभीर आहे आणि त्याला कायद्यानुसार शिक्षा मिळाली पाहिजे.
बीजिंगचे वकील मो शाओपिंग म्हणाले होते की, लाच प्रकरणात अनेकांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे, फाशीची शिक्षा ही फारच क्वचित दिली गेली आहे. लाईच्या बाबतीत भ्रष्टाचाराशी संबंधित रक्कम खूप मोठी आहे आणि कदाचित गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी रक्कम आहे. या प्रकरणामुळे जनतेमधील संतापही वाढला आहे. मृत्यूदंडाची लोकांमध्ये एक चेतावणी म्हणून पाहिले जात आहे. (हेही वाचा: Corruption Perceptions Index 2020: कोरोना काळात भारतामधील भ्रष्टाचारामध्ये वाढ; 2019 च्या तुलनेत 6 अंकांची घसरण (See List))
दरम्यान, नुकतेच ट्रान्सपरेंसी इंटरनॅशनलने नविन करप्शन परसेप्शन इंडेक्स 2020 जारी केला आहे. 180 देशांची नावे असलेल्या या क्रमवारीत भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारत 86 व्या स्थानावर आहे, तर शेजारील चीन 78 व्या स्थानावर आहे.