Corruption Perceptions Index 2020: कोरोना काळात भारतामधील भ्रष्टाचारामध्ये वाढ; 2019 च्या तुलनेत 6 अंकांची घसरण (See List)
Corruption (Photo Credits: Pixabay)

ट्रान्सपरेंसी इंटरनॅशनलने (Transparency International) नविन करप्शन परसेप्शन इंडेक्स 2020 (Corruption Perceptions Index 2020) जारी केला आहे. 180 देशांची नावे असलेल्या या क्रमवारीत भारत 86 व्या स्थानावर आहे. तर शेजारील चीन 78 व्या, पाकिस्तान 124 व्या आणि बांगलादेश 146 व्या स्थानावर आहे. या यादीमध्ये भ्रष्टाचार संपवण्याच्या उपाययोजनांच्या आधारे 180 देशांचे रँकिंग तयार केले गेले आहे. भ्रष्टाचार रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या देशांमध्ये सर्वात कमी, तर सर्वात खालच्या स्थानावर असलेल्या देशांमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार होत आहे. ट्रान्सपरेंसी इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय संस्था दरवर्षी जगातील देशांचा भ्रष्टाचार निर्देशांक तयार करते.

करप्शन पर्सेप्शन इंडेक्सच्या क्रमवारीत न्यूझीलंड आणि डेन्मार्क अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी 100 पैकी 88–88 गुण मिळवले आहेत. भारताला 40, चीनला 42, पाकिस्तानला 31 गुण मिळाले आहे. त्याचवेळी बांगलादेशला केवळ 26 गुण मिळाले आहेत. याशिवाय 100 पैकी 19 गुण मिळवून अफगाणिस्तानने 165 क्रमांक मिळविला आहे. पहिल्या दहा देशांविषयी बोलायचे झाले तर, न्यूझीलंड आणि डेन्मार्कनंतर सिंगापूर, स्वित्झर्लंड, फिनलँड आणि स्वीडनने 85 गुण मिळवले आहेत. त्याचबरोबर नॉर्वेला 84, नेदरलँडला 82, जर्मनी आणि लक्झेंबर्गला 80 गुण मिळाले आहेत.

2018 च्या अहवालात भारत 78 व्या स्थानावर होता. त्यानंतर 2019 च्या अहवालात तो 80 व्या स्थानावर होता. आता 2020 च्या अहवालात देशाला 86 वे स्थान मिळाले आहे.

यावेळी, भ्रष्टाचार निर्देशांक तयार करण्याच्या निकषांमध्ये कोरोना साथीच्या काळात घडलेल्या भ्रष्टाचारावर विशेष भर देण्यात आला आहे. या पॅरामीटर्समध्ये बांगलादेश पिछाडीवर आहे. या पॅरामीटर्सबाबत संस्थेच्या अध्यक्षा डिलिया फेरेरिया रुबिओ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 हे केवळ आरोग्य आणि आर्थिक संकटच नाही तर भ्रष्टाचाराचे संकट देखील आहे आणि आम्ही सध्या त्यास सामोरे जाण्यात अपयशी ठरलो आहोत.