Canada: कॅनडाचे पंतप्रधान Justin Trudeau कुटुंबासह गुप्त स्थानी स्थलांतरित; देशात अनेक ठिकाणी निदर्शने, जाणून घ्या कारण
Canada PM Justin Trudeau (Photo Credits: AFP)

कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (PM Justin Trudeau) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशात सुरु असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील त्यांचे निवासस्थान सोडले आहे आणि गुप्त ठिकाणी स्थलांतरित झाले आहे. कॅनडाची राजधानी ओटावा येथे शनिवारी हजारो लोकांनी लसीकरण अनिवार्य करण्याविरोधात आणि कोविड-19 निर्बंधांविरोधात निदर्शने केली. यादरम्यान काही आंदोलकांनी कोविड निर्बंधांची तुलना फॅसिझमशी केली आणि कॅनडाच्या ध्वजासह नाझी चिन्हे प्रदर्शित केली. अनेक आंदोलकांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांना लक्ष्य केले. यावेळी लोकांनी हातात बॅनर घेतले होते, ज्यावर पंतप्रधानांसाठी असभ्य आणि अभद्र शब्द लिहिले होते.

शनिवारी राजधानीच्या शहरात हजारो ट्रक ड्रायव्हर्स आणि इतर आंदोलक जमले आणि त्यांनी पंतप्रधान ट्रुडो यांच्या निवासस्थानाला घेराव घातला आणि कोरोना लस अनिवार्य करण्याचे आदेश आणि इतर सार्वजनिक आरोग्य निर्बंध संपवण्याचे आवाहन केले. मॉन्ट्रियल येथील डेव्हिड सँटोस म्हणाले की, लसीकरण अनिवार्य करणे हे आरोग्याशी संबंधित नाही, तर 'गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी' सरकारची एक युक्ती आहे असे त्यांना वाटते.

निषेधाच्या आयोजकांनी सर्व कोरोना निर्बंध तसेच लसीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यासह पंतप्रधान ट्रूडो यांच्या राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली. विरोध करणाऱ्यांपैकी बहुतांश ट्रक चालक आहेत, ज्यांना लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या ट्रक चालकांनी त्यांच्या 70 किलोमीटर लांबीच्या काफिल्याला 'स्वातंत्र्य काफिला' असे नाव दिले आहे. ट्रकचालक कॅनडाच्या ध्वजासह 'स्वातंत्र्या'ची मागणी करणारे झेंडे फडकावत आहेत. या आंदोलनात ट्रक चालकांसह इतर हजारो आंदोलकही सामील झाले आहेत, जे कोरोना निर्बंधांविरोधात आहेत. (हेही वाचा: ओमिक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी Moderna चा येणार खास बूस्टर डोस)

शनिवारी, 50,000 हून अधिक ट्रक चालक आणि इतर आंदोलक राष्ट्रीय राजधानी ओटावा येथे जमले. शहरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. महत्वाचे म्हणजे यामुळे ओटावाकडे जाणाऱ्या मार्गावर 70 किमीपर्यंत ट्रकची रांग लागली आहे, त्यामुळे इतर प्रवाशांनाही ये-जा करताना अडचणी येत आहेत. आंदोलन करणाऱ्या ट्रक चालकांना टेस्ला कंपनीचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांचाही पाठिंबा मिळाला आहे. या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या कुटुंबाला गुप्त ठिकाणी लपावे लागले आहे. पंतप्रधान ट्रुडो आणि त्यांचे कुटुंबीय कुठे लपले आहेत याची सध्या कोणालाही कल्पना नाही.