No Ban on ISKCON in Bangladesh: बांगलादेशच्या (Bangladesh) ढाका उच्च न्यायालयाने गुरुवारी देशातील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (ISKCON) च्या क्रियाकलापांवर बंदी घालण्याचा आदेश देण्यास नकार दिला. इस्कॉनवर बंदी घालण्याच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान अटर्नी जनरल कार्यालयाने सांगितले की, या प्रकरणाबाबत सरकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक पावले उचलली आहेत. सरकार या मुद्द्यावर लक्ष देईल. बांगलादेशचे ऍटर्नी जनरल म्हणाले की, इस्कॉनशी संबंधित समस्या बांगलादेशची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यावेळी बांगलादेश सरकारने म्हटले आहे की, चिन्मय दास यांच्या अटकेनंतर सरकारने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. सरकार (अतिरिक्त ऍटर्नी जनरल) यांनी कोर्टाला आश्वासन दिले की इस्कॉनचा मुद्दा सर्वोच्च प्राधान्याचा आहे.
अशाप्रकारे आता बांगलादेशमध्ये इस्कॉनवर बंदी घालण्यात येणार नाही. ढाका उच्च न्यायालयाने बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावत देशातील हिंदू अल्पसंख्याकांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच, उच्च न्यायालयाने अंतरिम सरकारला देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे. सरकारने देशातील धार्मिक अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. इस्कॉनच्या महंताच्या अटकेमुळे बांगलादेशात खळबळ उडाली आहे. बांगलादेशात राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांनी या अटकेचा तीव्र निषेध केला आहे. (हेही वाचा: Chinmoy Krishna Das Prabhu Arrest: ढाका पोलिसांनी चिन्मय दासला ताब्यात घेतलं, हिंदूंमध्ये संताप, इस्कॉननं केलं पंतप्रधान मोदींना आवाहन)
बांगलादेशात शेख हसीना सरकार पडल्यानंतर हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नुकतेच इस्कॉनचे महंत चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली ढाका विमानतळावरून अटक करण्यात आली. याच्या निषेधार्थ तेथे राहणारे हिंदू समाजाचे लोक रस्त्यावर उतरले. जोरदार निदर्शने झाली. आंदोलकांची पोलिसांशी झटापटही झाली. यावेळी एका वकिलाची हत्या करण्यात आली. यानंतर बांगलादेशमध्ये इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली.
या संदर्भात, उच्च न्यायालयाने बांगलादेशच्या ऍटर्नी जनरलकडून इस्कॉनच्या अलीकडील क्रियाकलापांबाबत सरकारने उचललेल्या पावलांची संपूर्ण माहिती मागवली आहे. इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत चितगाव आणि रंगपूरमध्ये होत असलेली निदर्शने थांबवण्यासाठी आणीबाणी लागू करण्याची परवानगी द्यावी, असे म्हटले होते. इस्कॉनवर बांगलादेशमध्ये कट्टरतावादी संघटना म्हणून काम केल्याचा आरोप आहे.