Layoffs in Argentina: अर्जेंटिनात 70,000 सरकारी कर्मचाऱ्यांची कपात होणार, राष्ट्राध्यक्षांनी दिली माहिती

अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर माइली यांनी अजेटिनातील सर्वात मोठी नोकर कपात करण्याची घोषणा केली आहे. जेवियर माइली यांनी येत्या काही महिन्यांत 70,000 सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची योजना जाहीर केली आहे. 26 मार्च रोजी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना जेवियर माइली यांनी सार्वजनिक कामे थांबवण्याचा, निधी कमी करण्याचा आणि अनेक सामाजिक कल्याण कार्यक्रम थांबवण्याचा त्यांचा निर्णय सांगितला. (हेही वाचा - Ericsson Layoffs: टेलिकॉम कंपनी एरिक्सन मध्ये 1200 कर्मचार्‍यांची नोकर कपात)

अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर माइली यांना कामगार संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. एका कामगार संघटनेने 26 मार्च रोजी संप सुरू केला, तर सरकारी अहवालात जेवियर माइली यांनी डिसेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यापासून खाजगी क्षेत्रातील कामगारांच्या पगारात मोठी घसरण झाली आहे. आर्थिक संकटातून जात असलेल्या देशाची अर्थव्यवस्था बदलण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आल्याचे जेवियर माइली यांच्या प्रशासनाने सांगितले.

अर्जेंटिनातील महागाई 200 टक्क्यांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता होती. सरकारी नियम, निर्यात आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारी उद्योगांचे खाजगीकरण करण्याची परवानगी देण्याचे आश्वासन जेवियर माइली यांनी निवडणुकीत दिले होते. या कर्मचारी कपातीला विरोध होत असला तरी राष्ट्राध्यक्ष आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष देशात सुमारे 300 बदल करणार आहेत. अनेक सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करणे, भाडेकरू, कर्मचारी आणि दुकानदार यांच्यासाठी अनुकूल नियम बनवणे, ऊर्जा आणि वाहतूक सबसिडी कमी करणे आणि काही सरकारी मंत्रालये बंद करणे या निर्णयांचा समावेश यात आहे.