England: नशेच्या आहारी जाऊन आपले जीवन उध्वस्त करून घेतलेल्या अनेक लोकांची उदाहरणे तुम्ही ऐकली असतील. मात्र एक आई नशेच्या आहारी जाऊन चक्क आपल्या बाळाचा जीव घेऊ शकते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. इंग्लंडमध्ये ही घटना घडली आहे. इंग्लंडमध्ये नॉटिंघमशायर (Nottinghamshire) मानवतेला तसेच आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घडणा घडली आहे. येथे एका 19 महिन्यांच्या मुलीला तिच्या मद्यधुंद आईने उकळत्या पाण्यात टाकले. याही पुढे जाऊन कोकेनचे (Cocaine) सेवन करीत असलेल्या या महिलेने मुलीला फक्त गरम पाण्यातच टाकले नाही तर, तिला त्याच अवस्थेत 1 तास तडफडू दिले. त्यानंतर मुलीचा मृत्यू झाला. आता कोर्टाने या महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, केटी क्रोडर नावाच्या 26 वर्षीय महिलेने आपली 19 महिन्यांची मुलगी ग्रेसीची उकळत्या पाण्यात टाकून हत्या केली. कोर्टात सरकारी वकिलांनी सांगितले की जेव्हा केटीने हा गुन्हा केला तेव्हा ती कोकेनच्या नशेत होती. केटीने फक्त मुलीवर पाणीच फेकले नाही तर, मुलीला तसेच त्याच अवस्थेत 1 तास ठेवले. अखेर त्या लहानग्याचा मृत्यू झाला. नॉटिंघम क्राउन कोर्टाने केटीला 21 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी निकाल देताना सांगितले की ही संपूर्ण घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. तसेच नशा करणारे पालक आपल्या मुलांसाठी किती धोकादायक ठरू शकतात याचेही हे उदाहरण असल्याचे कोर्टाने सांगितले. (हेही वाचा: नाशिक: दारूच्या नशेत वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याप्रकरणी मुलाला अटक)
Cocaine-using mother jailed for life for murdering her 19-month-old daughter by scalding her with boiling water https://t.co/LhnxeI8DM9
— Daily Mail U.K. (@DailyMailUK) December 16, 2020
ग्रेसीच्या पोस्टमॉर्टेम अहवालानुसार तिच्या शरीराचा 65% भाग उकळत्या पाण्याने भाजला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा खूप वेदनादायक मृत्यू होता कारण मुलगी भाजल्यामुळे नाही वेदनेमुळे मरण पावली. गरम पाण्यात ही मुलगी तब्बल एक तास जिवंत होती आणि तिचे प्राण वाचवले जाऊ शकत होते. परंतु केटीने तसे केले नाही. आता केटीच्या मानसिक स्थितीचेही मूल्यांकन करुन अहवाल न्यायालयात सादर करावा, असा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे.