Employment Benefits for Sex Workers: बेल्जियम या देशाने रविवारी म्हणजेच 1 डिसेंबर रोजी, अंमलात आलेल्या नवीन कायद्यांतर्गत सेक्स वर्कर्स (Belgium Sex Workers Law) अर्थातच लैंगिक कामगारांना आजारी रजा, प्रसूती लाभ आणि निवृत्तीवेतन यासारखे रोजगार अधिकार देत एक ऐतिहासिक पाऊल (Sex Workers Protections) उचलले आहे. जागतिक स्तरावर सर्वात प्रगतीशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कायद्याचा उद्देश वेश्याव्यवसाय किंवा तत्सम लैंगिक विषायबाबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा पुरविताना शोषणापासून संरक्षण देणे हा आहे. सन 2022 मध्ये बेल्जियममध्ये लैंगिक कार्याच्या गुन्हेगारीकरणानंतर (Decriminalisation of Prostitution) नवीन कायदा, हे सुनिश्चित करतो की, लैंगिक कामगारांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच वागणूक दिली जाईल. हा कायदा ग्राहकांना नकार दिल्याबद्दल बडतर्फ करण्यास देखील प्रतिबंधित करतो आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा, स्वच्छ कपडे, कंडोम आणि शॉवरसह इतरही सुरक्षा उपकरणे, उपाय पूरविणे बंधनकारक करतो.
नव्या कायद्यामुळे काय घडले?
- कायदा रोजगार लाभांची प्रमुख वैशिष्ट्येः लैंगिक कामगारांना आता आजारी रजा, प्रसूती हक्क आणि निवृत्तीवेतन योजना उपलब्ध आहेत-जे लाभ त्यांना पूर्वी उपलब्ध नव्हते.
- अनिवार्य सुरक्षा उपायः आपत्कालीन परिस्थितीत लैंगिक कार्यकर्त्यांना संदर्भ व्यक्तीशी जोडण्यासाठी नियोक्त्यांनी पॅनिक बटणे पुरविणे नव्या कायद्यानुसार आवश्यक आहे.
- नियोक्त्यांसाठी नैतिक मानकेः नियोक्त्यांकडे काम करण्यासाठी स्वच्छ कायदेशीर नोंद आणि बेल्जियममध्ये व्यावसायिक निवास असणे आवश्यक आहे. दोषी गुन्हेगारांना, किंवा तशी पार्श्वभूमी असलेल्या लैंगिक कार्यकर्त्यांना कामावर ठेवण्यास मनाई आहे.
- कामाच्या ठिकाणचे संरक्षणः नियम स्वच्छता आणि गोपनीयतेच्या तरतुदींसह स्वच्छ आणि सुरक्षित कामकाजाच्या परिस्थितीची खात्री करतात.
- कायद्याची व्याप्ती आणि मर्यादाः हा कायदा स्ट्रीप्टीज, पोर्नोग्राफी किंवा तत्सम बाबींसाठी लागू होत नाही.
सुरक्षिततेच्या दिशेने एक पाऊल, पण टीका कायम
मानवाधिकार संघटनांनी या कृतीचे कौतुक केले आहे. ह्युमन राईट्स वॉचच्या एरिन किलब्राइडने याला "मूलगामी" म्हटले आणि 'जगात आतापर्यंत आपण कुठेही पाहिलेले हे सर्वोत्तम पाऊल आहे. प्रत्येक देशाने या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे', असे कौतुगोद्गारही काढले. मात्र, स्त्रीवादी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी या कायद्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की, हा कायदा त्यांना स्वाभाविकपणे शोषक वाटत असलेल्या व्यवसायाला सामान्य करू शकतो.
स्वयंसेवी संस्थांकडून धोक्याची जाणीव
लैंगिक कामगारांना पाठिंबा देणाऱ्या इसाला या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवक ज्युलिया क्रुमियर यांनी असा इशारा दिला की, नगरपालिका प्रतिबंधात्मक स्थानिक नियम लादण्यासाठी कायद्याचा गैरवापर करू शकतात. ती म्हणाली, 'हे धोकादायक आहे कारण ते नेहमी हिंसक असलेल्या व्यवसायाला सामान्य करते'. बेल्जियमच्या फ्रँकोफोन महिला परिषदेने यापूर्वी या कायद्याला विरोध केला होता आणि तस्करीचे बळी ठरलेल्या आणि तरुण महिलांसाठी हे 'आपत्तीजनक' असल्याचे म्हटले होते.
सेक्स वर्कर्सकडून धक्कादायक अनुभव व्यक्त
दरम्यान, या कायद्याचे समर्थन करणाऱ्या व्हिक्टोरिया या माजी लैंगिक कार्यकर्त्याने तिचा वेदनादायक अनुभव सांगितला. या कार्यकर्त्याने म्हटले की, 'एका पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितले की, लैंगिक कार्यकर्त्यांवर बलात्कार होऊ शकत नाही. हा कायदा लोकांना आपल्याला सुरक्षित करण्यासाठी साधने देतो . आणखी एक लैंगिक कार्यकर्ता असलेल्या सोफीला तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काम केल्याचे सांगते. या लैंगिक विषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने म्हटले की, 'मला नऊ महिन्यांची गर्भवती असताना काम करावे लागले कारण मला पैशांची गरज होती. या कायद्याचा अर्थ असा आहे की मला यापुढे असे पर्याय निवडावे लागणार नाहीत'.
बेल्जियमचा कायदा लैंगिक कामगारांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. परंतु त्याच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. त्याच्या दीर्घकालीन परिणामांबाबत कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत, परंतु व्यवसायातील अनेकांसाठी हे त्यांचे हक्क आणि प्रतिष्ठेची अत्यंत आवश्यक स्वीकृती आहे.