World's Most Valued IT Company: TCS बनली जगातील सर्वाधिक मूल्यवान आयटी कंपनी; Accenture ला टाकले मागे
File image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही टाटा समूहाची प्रमुख कंपनी, जगातील सर्वाधिक मूल्यवान सॉफ्टवेअर कंपनी (World's Most Valued IT Company) बनली आहे. टीसीएसने सोमवारी अ‍ॅक्सेंचरला मागे टाकून हे स्थान प्राप्त केले. टीसीएसचे मार्केट कॅप 169.9 अब्ज डॉलर्स (जवळपास 12,43,540.29 कोटी) च्या पुढे गेले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही अशी संधी आली होती जेव्हा भारताच्या या दिग्गज आयटी कंपनीने, सर्वाधिक बाजारपेठ असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीच्या बाबतीत अ‍ॅक्सेंचरला मागे टाकले होते. सध्या अ‍ॅक्सेंचरचे मार्केट कॅप 12.50 लाख कोटी रुपये आहे.

भारतामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) नंतर, मार्केट कॅप 12 लाख कोटींपेक्षा जास्त असण्याचा विक्रमही टीसीएसकडे आहे. 2018 मध्ये या बाजारात आयबीएम अव्वल कंपनी होती. त्या काळात आयबीएमचा एकूण महसूल टीसीएसपेक्षा 300 टक्के अधिक होता. यानंतर, दुसर्‍या स्थानावर अ‍ॅक्सेंचर होती. मात्र गेल्या वर्षी एप्रिलमध्ये टीसीएसची बाजारपेठ 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली. टीसीएसचे त्रैमासिक रिझल्ट्स अपेक्षेपेक्षा चांगले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, म्हणूनच कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे आणि शेअर नव्या विक्रमाच्या पातळीवर पोहोचले. केवळ कंपनीचे प्रवर्तकच नव्हे तर गुंतवणूकदारांनाही याचा मोठा फायदा होतो.

टीसीएसचा मार्केट कॅप 5 ऑक्टोबर 2020 रोजी 10 लाख कोटी रुपयांवर पोहोचला. 28 डिसेंबर 2020 रोजी टीसीएसची बाजारपेठ प्रथमच 11 लाख कोटींच्या पुढे गेली. त्याचबरोबर आता टीसीएसची मार्केट कॅप वाढून 12.50 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत टीसीएसचा नफा 7.2 टक्क्यांनी वाढून 8,701 कोटी रुपये झाला. त्याचबरोबर कंपनीचा महसूल 5.4 टक्क्यांनी वाढून 42,015 कोटी रुपये झाला आहे. तिसऱ्या तिमाहीत टीसीएसने एकूण 680 दशलक्ष डॉलर्सचा डील जिंकली आहे. यामध्ये जर्मनीमधील पोस्टबँकमधील डील समाविष्ट नाही. (हेही वाचा: Google Warns Gmail Users: गुगलचा Gmail यूजर्संना इशारा; नवीन नियमांचे पालन न केल्यास बंद होतील 'हे' खास फिचर्स)

दरम्यान, टाटा समूहाने 1968 मध्ये स्टार्टअप म्हणून टीसीएसची सुरुवात केली होती. 1980 मध्ये टीसीएसने पुण्यात टाटा रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरची स्थापना केली. हे देशातील पहिले सॉफ्टवेअर संशोधन आणि विकास केंद्र आहे. 1993 मध्ये टाटाने कॅनडाची सॉफ्टवेअर फॅक्टरी-इंटिग्रिटी सॉफ्टवेयर कॉर्पोरेशनशी भागीदारी केली, जी नंतर टीसीएसने ताब्यात घेतली. रतन टाटा यांनी टाटा सन्सची सूत्रे हाती घेतल्यानंतर टीसीएसला एक मोठी उंची मिळाली.