UPI (Photo Credits: AIR/ Twitter)

UPI Transaction Limit Increased: देशात युपीआय व्यवहार (UPI Transaction) झपाट्याने वाढत आहेत. स्मार्टफोन वापरणारी जवळपास प्रत्येक व्यक्ती लहान-मोठे व्यवहार आणि पैसे हस्तांतरणासाठी युपीआय वापरत आहे. मोठ्या दुकानदारांपासून ते रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजीपाला दुकानांपर्यंत जवळजवळ सर्वांनी क्यूआर कोडद्वारे पैसे भरण्याची ही पद्धत अवलंबली आहे. ,अत्र, त्याच्या दैनंदिन व्यवहार मर्यादेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. आता याबाबत युपीआय वापरकर्त्यांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने काही पेमेंटसाठी व्यवहार मर्यादा वाढवली आहे.

नवीन नियम 16 ​​सप्टेंबरपासून, म्हणजेच आजपासून लागू होत आहेत. आता व्यवहाराची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. एनपीसीआय ने बँका, युपीआय ॲप्स आणि पेमेंट सेवा कंपन्यांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

याआधी 8 ऑगस्ट 2024 रोजी चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांच्या घोषणेदरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने युपीआय व्यवहार मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती, ज्यांची अंमलबजावणी सप्टेंबरमध्ये होणार होती. आरबीआयने कर भरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी युपीआयच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली आहेत. एनपीसीआयने कर भरणे, आयपीओ, आरबीआय  किरकोळ योजना, हॉस्पिटल आणि वैद्यकीय बिले आणि शैक्षणिक संस्था पेमेंट्ससाठी व्यवहार मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. हा नियम फक्त काही व्यवहारांवर लागू होईल. (हेही वाचा: Apple iOS 18 Release Date: आयफोन 16 सिरीजनंतर आता समोर आली ॲपल आयओएस 18 ची रिलीज डेट; जाणून घ्या कधी व कोणत्या युजर्ससाठी होणार उपलब्ध)

सध्या, इतर सर्व प्रकारच्या युपीआय व्यवहारांसाठी 1 लाख रुपयांची दैनिक मर्यादा आहे. बँका त्यांची स्वतःची युपीआय व्यवहार मर्यादा सेट करू शकतात. देशातील दोन सर्वात मोठ्या खाजगी बँका एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक पीअर-टू-पीअर पेमेंटसाठी 1 लाख रुपयांची युपीआय व्यवहार सुविधा पुरवणार आहेत. भांडवली बाजार, विमा, कलेक्शन आणि परदेशी आवक रेमिटन्सशी संबंधित युपीआय व्यवहारांची मर्यादा 2 लाख रुपये आहे. विविध युपीआय ॲप्समध्येही व्यवहार मर्यादा भिन्न आहे. एवढेच नाही तर बँका दैनंदिन युपीआय ​​व्यवहारांची मर्यादाही ठरवू शकतात.