United Payments Interface (Photo Credits: Twitter)

आपण जर युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या मदतीने पेमेंट करू इच्छित असाल, तर रात्री 1 ते 3 या दरम्यान ते करणे टाळा. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) म्हटले आहे की यूपीआय सेवेबाबत पुढील काही दिवस अपग्रेड प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेदरम्यान, वापरकर्त्यांना यूपीआयद्वारे पेमेंट करण्यात अडचण येऊ शकते. मात्र, ही प्रक्रिया किती काळ चालेल याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे एनपीचीआयने नमूद केलेल्या वेळेमध्ये शक्यतो युपीआय पेमेंट करणे टाळा.

एनपीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून अपग्रेडबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये एनपीसीआयने लिहिले आहे की, 'तुमचा पेमेंटचा अनुभव अधिक सुरक्षित आणि चांगला होण्यासाठी आम्ही आपला यूपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड करत आहोत. पुढील काही दिवस, यूपीआय वापरकर्त्यांना रात्री एक ते तीन दरम्यान पेमेंट करताना अडचण येऊ शकते. तरी तुमचे पेमेंट्स या वेळेनुसार जुळवून घ्या.’

एनपीसीआयने आपल्या संकेतस्थळावर नमूद केले आहे की, इन्फॉर्मेशन सिक्योरिटी टीम विशेष तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सायबर धमक्यांना ओळखते आणि ते व्यवस्थापित करते. हे तंत्रज्ञान विविध उद्योगातील सर्वोत्तम पद्धती आणि मार्गदर्शकतत्त्वे असलेल्या प्रशिक्षित तज्ञांद्वारे वापरले जाते. एनपीसीआय वेगाने वाढणार्‍या सायबर धोक्यांविरुद्ध लढा देण्यासाठी मल्टी लेयर्ड डिफेन्स तयार करून सुरक्षा सुधारण्याचे काम करत असल्याचेही कळविण्यात आले आहे. (हेही वाचा: ATM मधून पैसे काढल्यानंतर ताबडतोब करा 'हे' काम अन्यथा होऊ शकते फसवणूक!)

भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) यूपीआय प्लॅटफॉर्मवर सध्या 165 बँका सूचीबद्ध आहेत. ऑक्टोबर 2020 पर्यंत एनपीसीआयने 15.51 दशलक्ष अँड्रॉइड वापरकर्ते आणि 29.4 दशलक्ष आयओएस वापरकर्त्यांची नोंदणी केली आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे कॉन्टॅक्टलेस पेमेंटची गरज वाढल्याने ऑनलाइन पेमेंटला चालना मिळाली आहे. तसेच प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना  डिस्काउंट कूपन आणि कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहेत, जेणेकरून त्यांचा यूपीआयचा वापर वाढू शकेल.