ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

देशातील एटीएम (ATM) फ्रॉडच्या बाबतीत आरबीआय (RBI) सोबतच  सर्व बँका वेळोवेळी नागरिकांना सतर्क करत असतात. नागरिकांनी देखील थोडी काळजी घेतली तर फसवणूक टाळता येऊ शकते. दरम्यान, एटीएम डेटा चोरण्यासाठी फ्रॉडर्स डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करतात. लोकांचा बँक डेटा मिळविण्यासाठी एटीएममध्ये स्किमर, कॅमेरे आणि वाय-फाय डिव्हाईस ठेवले जातात. यामुळे अगदी सहज फसवणूक होऊ शकते. एटीएम कार्ड क्लोनिंग करण्यासाठी देखील उपकरणं वापरली जात आहेत. तर फसवणूकीसाठी अनेकदा बनावट किबोर्ड सुद्धा  लावले जातात. (पुणे: महिलांचा वेश धारण करुन चोरट्यांनी फोडली ATM मशिन; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)

एटीएम मधून पैसे काढताना 'या' गोष्टींची काळजी घ्या!

# एटीएममधून पैसे काढल्यानंतर किंवा इतर काम पूर्ण केल्यावर ग्राहकांनी त्वरित कॅन्सल बटण दाबावे. असे केल्याने आपण निघून गेल्यानंतर कोणीही आपल्या एटीएम कार्डद्वारे कोणत्याही प्रकारची अॅक्टीव्हीटी करु शकणार नाही.

# एटीएम वापरण्यापूर्वी लोकांनी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी. निर्जन किंवा दुर्गम भागातील एटीएम वापरणे नेहमीच टाळावे. कमी गर्दी असलेल्या एटीएममध्ये फसवणूकीची प्रकरणे अधिक आहेत. त्यामुळे गर्दी जास्त असेल त्या एटीएममध्ये जाणे सुरक्षित ठरु शकते.

# सीसीटीव्ही कॅमेरा दिसत नाही किंवा तो बिघडला आहे अशा एटीएम बूथमध्ये व्यवहार करणे टाळा. कारण अशा ठिकाणी फसवणूकीची अधिक शक्यता असते. (ATM PIN: बँकेत न जाता एटीएम कार्डचा पिन रिसेट कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)

# व्यवहारानंतर लोक एटीएम बूथमध्ये पावती टाकतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण त्या पावतीमध्ये छापलेल्या तपशीलांच्या मदतीने फ्रॉडर्स तुम्हाला लक्ष्य करू शकतात.

दरम्यान, एटीएम मधून पैसे काढताना तुम्हाला कोणत्याही त्रास जाणवल्यास ग्राहक बँकेच्या हेल्पलाईन किंवा ब्रॉंचमध्ये जावून तुम्ही तक्रार दाखल करु शकता. आरबीआयच्या नियमानुसार, बँकेला लवकरात लवकर तुमच्या तक्रारीचे निवारण करणे अनिवार्य आहे.