Russia-Ukraine Crisis: युक्रेन-रशिया युद्धामुळे स्मार्टफोनच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण
Smartphone (PC - pixabay)

Russia-Ukraine Crisis: रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. युक्रेननेही माघार न घेण्याची घोषणा केली आहे. या युद्धाचा परिणाम इतर देशांवरही झाला आहे. त्यामुळे अगोदरच चिप टंचाईचा सामना करत असलेल्या उद्योगाची अवस्था आणखी बिकट होणार आहे. यामुळे स्मार्टफोनही महाग होऊ शकतात. Techcet या रिसर्च फर्मच्या मते, युक्रेन हा निऑन गॅसचा मोठा उत्पादक देश आहे. चिप बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या लेसरसाठी याचा वापर केला जातो. यू.एस. 90 टक्के सेमीकंडक्टर-ग्रेड निऑनचा पुरवठा करते.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सांगितल्यानुसार, पॅलेडियमचा 35 टक्के स्त्रोत रशिया आहे. या दुर्मिळ धातूचा उपयोग अर्धसंवाहक बनवण्यासाठीही केला जातो. या दोन देशामधील तणावामुळे या घटकांची निर्यात कमी होईल. जे 50 टक्के निऑन पूर्व युरोपमधून घेतात त्यांच्यावर याचा मोठा परिणाम होईल. (वाचा - What is NATO? जाणून घ्या नक्की काय आहे 'नाटो' संघटना, त्याचा उद्देश आणि सध्या किती देश आहेत सामील)

जेपी मॉर्गन यांच्या मते, कंपन्या चीन, अमेरिका आणि कॅनडामध्ये जाऊन पुरवठा वाढवू शकतात. परंतु, त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. मायक्रो चिपची कमतरता ही 2021 सालची मोठी समस्या आहे. 2022 मध्ये ही समस्या संपेल असा अंदाज काही विश्लेषकांनी वर्तवला होता.

दरम्यान, आता या युद्धाबाबत हे शक्य होताना दिसत नाही. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादण्याचे म्हटले असून, रशियाकडून मायक्रोचिपचा पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. परंतु, वर नमूद केल्याप्रमाणे, रशिया-युक्रेन हे मायक्रोचिप तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या उत्पादनांचे प्रमुख पुरवठादार आहेत.

चिप निर्माते ही समस्या एक किंवा दोन आठवडे होल्डवर ठेवू शकतात. परंतु, पुरवठा बराच काळ ठप्प राहिला, तर त्याचा मोठा परिणाम दिसून येईल. याचा परिणाम अर्धसंवाहकांच्या उत्पादनावर होईल. परिणामी स्मार्टफोन, कार यासारखी मायक्रोचिप उत्पादनेही महाग होण्याची शक्यता आहे.