बराक ओबामा, बिल गेट्स अशा हाय प्रोफाईल लोकांच्या ट्विटर हॅक प्रकरणात तीन आरोपींना अटक; 17 वर्षांचा मुलगा सूत्रधार, एका दिवसात कमावले 1 लाख डॉलर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी नामांकित राजकारणी, सेलिब्रिटी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांचे ट्विटर अकाउंट हॅक (Twitter Hack) झाल्याने एकाच खळबळ उडाली होती. बिल गेट्स (Bill Gates), एलोन मस्क, केन्ये वेस्ट, बराक ओबामा (Barack Obama) अशा अनेक हाय प्रोफाईल लोकांचे ट्विटर हॅक झाले होते. याप्रकरणी शुक्रवारी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूकेमधील 19 वर्षीय मेसन शेपर्ड (Mason Sheppard) जो ऑनलाइन 'चीवन' (Chaewon) या नावाने वावरतो, ऑरलँडोच्या 22 वर्षीय निमा फाजली (Nima Fazeli) उर्फ रोलेक्स, यासह 17 वर्षीय ग्रॅहम इव्हान क्लार्क (Graham Ivan Clark) यांना ताब्यात घेतले आहे. क्लार्क यातील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेचे अ‍ॅटर्नी डेव्हिड अँडरसन (Attorney David Anderson) यांनी ही माहिती दिली. यातील 17 वर्षांच्या सुत्राधारावर 30 आरोप आहेत. हा ट्विटर हल्ला बिटकॉइन घोटाळ्यास चालना देण्यासाठी करण्यात आला होता. या प्रकरणात एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) आणि न्याय विभागाने संपूर्ण चौकशी केली, त्यानंतर या मुलाला अटक करण्यात आली. फ्लोरिडाच्या टांपा येथील रहिवासी असलेल्या मुलावर, खोटेपणा, कम्यूनिकेशन फ्रॉड, चोरी आणि हॅकिंगचा आरोप आहे. हिल्सबरो स्टेट अटर्नी अँड्र्यू वॉरेन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य अटर्नी म्हणाले की त्याने, बिटकॉइनमधून दिवसाला दहा लाख डॉलर्स मिळवले आहेत. (हेही वाचा: अमेरिकेमध्ये बराक ओबामा, बिल गेस्ट सह हाय प्रोफाईल अकाऊंट्स हॅक; ट्वीटरचे सीईओ Jack Dorsey यांनी हा प्रकार धक्कादायक असल्याची व्यक्त केली प्रतिक्रिया)

शुक्रवारी ट्विटरने माहिती दिली की, या हल्ल्यामागील हॅकर्सनी सिस्टममध्ये घुसण्यासाठी 'टेलीफोन फिशिंग' (Telephone Phishing) यंत्रणा वापरली. 15 जुलै रोजी झालेल्या या हॅकिंगमध्ये जगातील नामांकित व्यक्तींच्या ट्विटर अकाऊंटवरून फेक ट्विट केले गेले होते. या सर्व खात्यांवरील बनावट ट्विटमध्ये, खास बिटकॉइन खात्यावर एक हजार डॉलर्स पाठविल्यावर दोन हजार डॉलर्स परत मिळण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हा गुन्हा प्रसिद्ध लोकांच्या नावावरुन घडला असला तरी, यामागे सर्वसामान्यांकडून चोरी करण्याचा हेतू असल्याचे वॉरेन यांनी सांगितले.