प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits-Edit File/Facebook))

हल्ली कोणत्या गोष्टीची चोरी होईल याचा काहीच भरवसा नाही. त्यात मोबाईल फोनच्या चोरी (Stolen Mobile Phone) ही गोष्ट तर फारच कॉमन झाली आहे. फोन चोरी केल्यावर तो पूर्णतः रिकामा करून परत नव्याने वापरण्यासाठी तयार केला जातो. एकदा फोन चोरी झाल्यावर तो कितीही प्रयत्न केला तरी सापडण्याची शक्यता फार कमी असते. याच्यावर उपाय म्हणून दूरसंचार विभागातर्फे एक नवी यंत्रणा सुरु केली जाणार आहे. यामुळे चोरीला गेलेल्या मोबाइल फोनचा नेमका शोध घेऊन तो फोन वापरण्यासाठी पूर्णपणे निरुपयोगी करणे शक्य आहे.

ही सेवा लवकरच देशात सुरु होण्याची शक्यता आहे, त्यामुळे चोरी केलेला फोन पुन्हा वापरणे शक्य होणार नाही. प्रत्येक फोनसाठी स्वतंत्र ‘आयएमईआय’ क्रमांक (IMEI Number) असतो. देशातील सर्व फोन्सचे हे सर्व क्रमांक एकत्रित संकलित केले जाणार आहेत. त्यानुसार संपूर्ण देशासाठी ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी रजिस्टर’ (CEIR) तयार केले जाणार आहे. त्यामुळे जर का कोणी आपला फोन हरवला आहे किंवा चोरीला गेला आहे अशी तक्रार केल्यास, त्या फोनची सेवा पूर्णतः बंद केली जाईल. (हेही वाचा: फोनचा IMEI नंबर का महत्वाचा असतो हे तुम्हाला माहिती आहे का?)

ग्राहकाने तक्रार केल्यावर त्या फोनचा ‘आयएमईआय’ नंबर लगेच या रजिस्टरमध्ये नोंदविला जाईल आणि त्याची माहिती सर्व सेवा पुरवठादार कंपन्यांनाही तात्काळ दिली जाईल. थोडक्यात त्या ‘आयएमईआय’ नंबरचा मोबाईल फोन ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकला जाईल. हा नंबर ‘ब्लॅक लिस्ट’ मध्ये टाकल्यावर त्यामध्ये कोणतेही बदल करणे, जसे की सीम कार्ड बदलणे शक्य होणार नाही. ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅफ टेलेमॅटिक्स’कडे यांनी जुलै 2017 पासून ही यंत्रणा विकसित करण्यास सुरुवात केली आहे.