Representational Image | (Photo Credit: Twitter)

सिंगापूरस्थित ग्रुप आयबी सुरक्षा संशोधन पथकाने (Cyber Security Group) डार्क वेबवर क्रेडिट व डेबिट कार्ड तपशिलांचा मोठा डेटाबेस शोधून काढला आहे. ट्रॅक -1 आणि ट्रॅक -2 या दोन आवृत्त्यांमध्ये, इंडिया-मिक्स-न्यू -01 (INDIA-MIX-NEW-01) म्हणून डब केलेला डेटा उपलब्ध आहे. यामध्ये 1.3 दशलक्षपेक्षा अधिक वापरकर्त्यांची क्रेडीट आणि डेबिट कार्ड संबंधित माहिती समाविष्ट आहे. कार्डच्या मागील बाजूस असलेल्या चुंबकीय पट्टीमधील सर्वात महत्त्वाचा ट्रॅक -2 डेटा चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यात ग्राहकांचे प्रोफाइल आणि व्यवहारांची सर्व माहिती आहे.

ट्रॅक -1 डेटामध्ये केवळ कार्ड नंबर असतात. सापडलेल्या एकूण खात्यांपैकी 98 टक्के डेटा हा भारतीय बँकांचा आहे आणि उर्वरित माहिती  कोलंबियाच्या वित्तीय संस्थांची आहे. ग्रुप आयबीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, प्रत्येक कार्ड 100 डॉलर्स (अंदाजे 7.092 रुपये) मध्ये विकले जात आहे. या डेटाची एकूण किंमत जवळजवळ 130 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे (सुमारे 921.99 कोटी रुपये). अशा प्रकारे हर्ड वेबवर विक्रीसाठी ठेवलेला हा सर्वात महागडा डेटा आहे. (हेही वाचा: उस्मानाबाद: सायबर मधील इंटरनेटचा वापर केल्यावर 40 रुपयांच्या बिलावरुन वाद, ग्राहकाकडून मालकाची हत्या)

गेल्या 12 महिन्यांत भारतीय बँकांमधील कार्डांची ही सर्वात मोठी हॅकिंग आहे, जी बाजारात विक्रीसाठी आली आहेत. या डेटाबेसच्या विक्रीचा धोका लक्षात घेऊन ग्रुप-आयबीच्या इंटेलिजेंसने आधीच ग्राहकांना माहिती दिली होती. तसेच योग्य अधिकार्‍यांच्या कानावरही ही माहिती घालण्यात आली होती. मात्र नक्की कोणत्या बँकांमधून ही माहिती बाहेर पडली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. ग्रुप-आयबीने म्हटले आहे की, 18 टक्के पेक्षा जास्त कार्डे एकाच भारतीय बँकेची आहेत.