Telegram App जगात होतंय सर्वाधिक डाऊनलोड,  WhatsApp ला दणका; TikTok, Signal ने फेसबुकला टाकले मागे
Telegram vs WhatsApp | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सोशल मीडियाच्या (Social Media) जगात इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप किती वापरली जातात याबाबत आपण जाणताच. त्यामुळे अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या जगभारातील अॅपमध्ये नेहमीच एक तीव्र स्पर्धा असते. या स्पर्धेत आता टेलिग्राम (Telegram) अॅपने बाजी मारली आहे. टेलिग्रामने एकेकाळी जगभरात लोकप्रिय आणि अव्वल असलेल्या WhatsApp ला मागे टाकले आहे. जगभरात टेलीग्रम हे युजर्सकडून सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप म्हणून पुढे आले आहे. विशेष म्हणजे टेलिग्रामसोबतच टिक टॉक (TikTok), सिंग्नल (Signal) आदी अॅपनी फेसबुक (Facebook), व्हाट्सअॅप (WhatsApp ) यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे.

WhatsApp ने नुकतीच आपल्या प्रायव्हसी पॉलिसी बदलून त्यात काही नवे नियम अंतर्भूत केले. त्यामुळे जगभरातील युजर्सच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर संशयकल्लोळ निर्माण झाला. परिणामी व्हॉट्सॅपच्या धोरणांवर प्रचंड टीका झाली. त्यानंतर युजर्सकडून व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करण्याची एक लाटच आल्याचे पाहायला मिळाले. याचाच फटका आता व्हॉट्सअॅपला मोठ्या प्रमाणावर बसल्याचे पाहायला मिळते आहे.

जगभरातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार टेलिग्राम (Telegram) हे जानेवारी महिन्यात जगभरात सर्वाधिक डाऊनलोड होणारे नॉन गेमिंग अ‍ॅप ठरले आहे. एका आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात 24% भारतीयांनी Telegram अ‍ॅप डाउनलोड केले. तर एकूण जगभरातील युजर्सच्या आकडेवारीबाबत बोलायचे तर तब्बल 63 मिलियन म्हणजे 6.3 कोटी लोकांनी टेलिग्राम अॅप डाऊनडोल केले आहे. यापैकी 1.5 कोटी युजर्स केवळ भारतातीलच आहेत. Sensor Tower ने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा, Samsung कंपनीचा F62 स्मार्टफोन येत्या 15 फेब्रुवारीला होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत)

जानेवारी 2021 मध्ये कोणते अॅप अव्वल

सेन्सर टॉवर्सने दिलेल्या अहवालानुसार जानेवारी 2021 मध्ये सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या पहिल्या 5 अॅपची क्रमवारी खालीलप्रमाणे.

  • Telegram- प्रथम क्रमांकावर
  • TikTok - दुसऱ्या क्रमांकावर
  • Signal - तिसऱ्या क्रमांकावर
  • Facebook - चौथ्या क्रमांकावर

Sensor Tower ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, Telegram अॅप डाऊनलोड करण्यामध्ये भारतानंतर इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. इंडोनेशियातील 10% युजर्सनी हे अॅप डाऊनलोड केले.