
Telecom Revenue Per User: मोबाईल आणि डेटा टॅरिफमध्ये वाढ झाल्यामुळे, दूरसंचार कंपन्यांची प्रति ग्राहक कमाई (ARPU) दशकभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचणार आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने सांगितले की, 2025-26 पर्यंत, या कंपन्या प्रत्येक मोबाइल ग्राहकाकडून 225-230 रुपये कमावतील, जे गेल्या आर्थिक वर्षातील 180 रुपयांपेक्षा 25 टक्के अधिक आहे. उच्च नफा आणि कमी भांडवली खर्चामुळे दूरसंचार कंपन्यांच्या पत स्थितीतही सुधारणा होईल, असे क्रिसिलने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. एआरपीयु हा कोणत्याही दूरसंचार कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारा एक प्रमुख घटक आहे.
5जी सेवा सुरू झाल्यानंतर वाढलेल्या डेटा वापरामुळे एआरपीयुला देखील मदत होईल. व्होडाफोन, एअरटेल आणि जिओने अलीकडेच त्यांचे दर 25 टक्क्यांनी वाढवले आहेत. या टॅरिफ वाढीमुळे 2025-26 च्या अखेरीस टेलिकॉम उद्योगासाठी भांडवलावरील परतावा 11 टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत होईल. 2023-24 मध्ये तो 7.5 टक्के होता. त्याचप्रमाणे, बहुतेक कंपन्यांनी 5जी रोलआउट पूर्ण केल्यामुळे पुढील आर्थिक वर्षात कंपन्यांची गुंतवणूक 28 टक्क्यांवरून 19 टक्क्यांवर घसरेल.
अहवालानुसार, व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा, सोशल मीडिया आणि गेमिंग ॲप्सच्या अतिवापरामुळे डेटाचा जास्त वापर होत आहे. यामुळे ग्राहक त्यांचे डेटा प्लॅन अपग्रेड करत आहेत. त्यामुळे एआरपीयूमध्ये हळूहळू वाढ होईल, असे एजन्सीने म्हटले आहे. त्याचा संपूर्ण परिणाम चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्षात दिसून येईल. या वाढीचा सर्वात मोठा परिणाम प्रीपेड ग्राहकांवर दिसून येईल, कारण त्यांची संख्या मोठी आहे. (हेही वाचा: BSNL Cheapest Recharge Plan: अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 30 दिवसांची वैधता; BSNL चा हा छोटा रिचार्ज सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम)
दरम्यान, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या मोबाईल सेवा ग्राहकांची संख्या मे महिन्यात 34.4 लाखांनी वाढली आहे, तर व्होडाफोन आयडियाचा वापरकर्ता बेस कमी होत आहे. जिओने मे महिन्यात 21.9 लाख मोबाइल ग्राहक जोडले, तर भारती एअरटेलने 12.5 लाख मोबाइल ग्राहक जोडले. त्याच वेळी, व्होडाफोन आयडियाचे मोबाइल ग्राहक या महिन्यात 9.24 लाखांनी कमी झाले आहेत.