प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

काही वर्षांपूर्वीपर्यंत लोकांकडे इंटरनेट नव्हते, म्हणूनच कदाचित पॉर्न कल्चरही (Porn Culture) अगदी नाच्या बरोबरीने होते. मात्र आता जग तांत्रिकदृष्ट्या चांगले प्रगत झाले आहे, त्याचसोबत पॉर्न इंडस्ट्रीही (Porn Industry) मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. आजकाल इंटरनेटवर विविध प्रकरच्या पॉर्नचा सुळसुळाट झाला आहे. अगदी शाळेत जाणारी मुलेही पॉर्नच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. मात्र आता यामध्ये अजून एका प्रकारच्या पॉर्नची भर पडणार असून, त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात असे तज्ज्ञ सांगतात. कायदेशीर तज्ज्ञांनी दावा केला आहे की, डीपफेक पॉर्नोग्राफी (Deepfake Pornography) ही येणाऱ्या काळात लैंगिक अत्याचाराची (Sexual Abuse) एक महामारी असल्याचे सिद्ध होऊ शकते.

काही वर्षांपूर्वीपर्यंत, एखाद्या व्यक्तीचा चेहरा बदलून त्याची प्रतिमा मॉडीफाईड करण्यात आल्याच्या बातम्या येत जोत्या. परंतु आता डीपफेक टेक्नॉलॉजीमुळे व्हिडिओमध्येही तीच प्रक्रिया वापरली जात आहे. ही गोष्ट बर्‍याच लोकांसाठी विशेषत: स्त्रियांसाठी हानिकारक ठरू शकते. डीपफेक असे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही मानवी शरीरावर कोणताही चेहरा लावता येतो. हे तंत्र इतके प्रभावी आहे की एखाद्या व्हिडीओमध्ये असे केल्यास ते कोणाला कळूनही येणार नाही की हा चेहरा त्या व्यक्तीचा नाही.

काही काळापूर्वी जेव्हा डीपफेक तंत्र बाजारात व्हायरल झाले तेव्हा बऱ्याच लोकांना असे वाटले की यामुळे बनावट बातम्यांच्या घटनांमध्ये खूप वाढ होऊ शकते. कारण कोणत्याही राजकारण्याची बनावट प्रतिमा वापरून त्याद्वारे कोणतेही विधान व्हायरल होऊ शकते. मात्र आता पॉर्नोग्राफी इंडस्ट्रीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

डीपफेक्स तज्ञ हेन्री एजर या तंत्रज्ञानाच्या विकासाचे अगदी जवळून अनुसरण करीत आहेत. डीपफेकची क्रेझ सन 2017 च्या सुमारास सुरु झाल्याचे त्यांनी बीबीसीला सांगितले. एखाद्या व्यक्तीने ओपन सोअर्स सॉफ्टवेयर शेअर केल्यामुळे हे तंत्रज्ञान सामान्य लोकांसाठीही उपलब्ध झाले आहे. ते पुढे म्हणतात याचा बराच गैरवापर होऊ शकतो आणि त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

डरहम युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मॅकग्लिन यांनी या प्रकरणात म्हटले की सध्या जरी डीपफेकला बळी पडलेल्या लोकांची संख्या कमी असली तरी, आपण त्याबद्दल पूर्णपणे निष्काळजी राहिलो तर भविष्यात ही एक मोठी समस्या बनू शकते. ते पुढे म्हणाले की, जर आपण या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवले नाही आणि गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर ते साथीच्या रोगाचे रूप घेऊ शकते. त्यावेळी त्यास शोषणाची महामारी म्हणणे चुकीचे ठरणार नाही.