Representational Image (Photo Credits: Pexels)

Jupiter & Saturn great conjunction Time In India:  आज 21 डिसेंबर दक्षिणायनाचा दिवस. नाताळ सण आणि न्यू इयरची चाहूल घेऊन येणारा आजचा नवा आठवडा अवकाशप्रेमींसाठी देखील खास आहे. सुमारे 400 वर्षांनंतर आता अवकाशामध्ये सौर मंडळातील सर्वात मोठे ग्रह गुरू आणि शनि जवळ येणार आहेत. आज 21 डिसेंबर रोजी सर्वात मोठ्या रात्री या खगोलीय घटनेचा अद्भुत नजारा अनुभवता येणार आहे. तर नाताळ म्हणजेच क्रिसमसच्या तोंडावर हा घटना अनुभवता येणार असल्याने ख्रिसमस स्टार (Christmas Star) किंवा बेथलेहेमचा स्टार देखील म्हटले जात आहे. या वेळी या ग्रहांमधील अंतर केवळ 0.1 डिग्री असेल. दक्षिणायन व गुरु-शनीची युती होणार असल्याने गुगलचे स्पेशल Google Doodle.

नासाने दिलेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान हे दोन ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ असतील. या वर्षाची ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे, कारण 400 वर्षांनंतर ते एकमेकांच्या जवळ येणार आहेत आणि सुमारे 800 वर्षांनंतर, शनि आणि गुरू एकत्र येत आहेत. ही घटना दुर्बिणीमधूनही पहिली जाऊ शकते. नासा देखील त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग प्रक्षेपित करणार आहे. त्यामुळे खराब हवामानामुळे तुम्हांला थेट डोळ्यांनी ते पाहता येत नसेल तर युट्युब किंवा सोशल मीडीयावरही त्याचा अनुभव घेऊ शकता.

भारतामध्ये गुरू-शनी युती कधी आणि कोणत्या वेळी दिसेल?

आज गुरू-शनी युती पहाण्यासाठी उत्तम वेळ संध्याकाळी 6.30 ते 7.30 आहे. तुम्हांला ही युती संध्याकाळी पश्चिमेला दिसेल.  थेट साध्या डोळ्यांनी पाहिल्यास गुरू-शनी एकत्रच दिसतील. दुर्बिणीतून पाहिल्यास- गुरू-शनीमध्ये अंतर दिसेल. गुरू शनीपेक्षा जास्त तेजस्वी दिसेल. गुरूचे चार चंद्र दिसतील. शनीची वलये दिसतील.अशी माहिती पंचागकर्ते दा कृ सोमण यांनी दिली आहे.

सन 1226 मध्ये हे दोन ग्रह इतके जवळ आले. आजच्या 21 डिसेंबर 2020 नंतर, 15 मार्च 2080 च्या रात्री गुरू-शनि एकमेकांच्या इतक्या जवळ दिसणार आहेत. अवकाशात शनि आणि गुरू मध्ये 400 मैल अंतर आहे. परंतु ते एकमेकांच्या जवळ आल्याने आकाशात एक प्रकाशबिंदू निर्माण होईल, ज्यामुळे ही घटना पृथ्वीवरून देखील दिसणार आहे.