
सध्या सर्वत्र ख्रिसमस आणि 31 डिसेंबर साठी जोरदार तयारी सुरु झालेली पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमिवर मुंबईसह महाराष्ट्रात दारूची आयात-निर्यात केली जाणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. याच धर्तीवर खबरदारीच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने लोणावळ्याजवळील कुसगाव टोलनाक्यावर मोठीकारवाई केली आहे. गोवा (Goa) येथून महाराष्ट्रात येत असलेल्या कंटेनरची झडती घेत हा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालात 2,000 विदेशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले असून त्यात एकून 1 कोटी 46 लाख 81 हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. Tv9 मराठी ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आह.
राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला गोव्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून हा मद्यसाठा आणला जाणार होता. यानुसार कुसगाव पथकर वसुली नाका येथे पोलिसांनी सापळा रचला. रविवारी पहाटे पथकर नाक्यावर 14 चाकी कंटेनर आला. पोलिसांनी या कंटेनरला तपासणीसाठी थांबवले. त्यावेळी चालक आणि क्लीनरच्या माहितीवरुन त्यांना हे प्रकरण संशयास्पद वाटले.
हेदेखील वाचा- मुंबई महानगरपालिकेची मोठी कारवाई; अनधिकृत फेरीवाल्यांच्या 4 हजार 300 चारचाकी हातगाड्या नष्ट
त्यामुळे पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली. त्यावेळी कंटेनरमध्ये गोवा बनावट विदेशी मद्याचे दोन हजार बॉक्स आढळले. पोलिसांनी हा मद्यसाठा आणि कंटेनर असा एकूण एक कोटी 46 लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यानंतर कंटेनर चालक आणि क्लीनर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच याप्रकरणी वाहन मालक, मद्यसाठा पुरवठादार, वाहतूकदार, मद्य खरेदीदार व गुन्ह्याशी संबंधित असलेल्या इतर इसमांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.